लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्माने स्वत:च्या गुणवत्तेवर जिवंत राहावे, असा भगवान बुद्धाचा विचार होता. त्यामुळे त्यांनी भीती दाखवून धम्माचा प्रचार-प्रसार केला नसून, आपला उत्तराधिकारीही नेमला नाही. भगवान बुद्धाने बुद्ध धम्म देऊन जगाला परिवर्तनाची दिशा दिली, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी केले.विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात डॉ. प्रदीप आगलावे यांच्या ‘धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक गायकवाड, आंबेडकरी साहित्यिक डॉ. प्रकाश खरात, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सरोज आगलावे उपस्थित होते. प्रा. अशोक गोडघाटे म्हणाले, बाबासाहेबांनी जागतिक स्तरावरील मानवजातीसाठी कोणता धर्म चांगला आहे याचा विचार करून बुद्ध धम्म स्वीकारला. त्यामुळे लोक बाबासाहेबांची पूजा ही काही मागण्यांसाठी नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतात. आज बुद्ध धर्म दिल्यामुळे गावकुसाबाहेर राहणाऱ्या माणसांची सुंदर घरे गावात पाहावयास मिळतात. सर्वांना समान संधी देण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रकाश खरात म्हणाले, बाबासाहेबांच्या चळवळीचे प्रतिबिंब आगलावे यांच्या पुस्तकात आहे. बाबासाहेबांची चळवळ मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारी होती. त्यांनी दिलेल्या बुद्धिस्ट संकल्पनेवर सर्वांनी काम करण्याची गरज आहे. समाजातील श्रीमंत, सुशिक्षितांनी जे गरीब आणि अशिक्षित आहेत, त्यांच्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या राजकीय पक्ष पुन्हा उभा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी वैचारिक परिवर्तन झाल्याशिवाय माणूस बदलत नसल्याचे सांगून, चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे लेखन समाजासमोर येण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. अशोक गायकवाड यांनी बौद्ध धर्म कृतिशील असून बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविकातून डॉ. राहुल भगत यांनी १९५६ नंतरची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती आगलावे यांच्या पुस्तकात असल्याचे सांगितले. अहिल्या रंगारी यांनी कविता सादर करून प्रदीप आगलावे यांना मानचिन्ह प्रदान केले. आभार डॉ. सरोज आगलावे यांनी मानले.