नागपूर : ग्राहकासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे लॉर्ड लॅण्ड डेव्हलपरला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा जोरदार दणका बसला. आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाचे २ लाख ५० हजार रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश या डेव्हलपरला दिला. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमदेखील डेव्हलपरनेच द्यायची आहे.
शारदाप्रसाद गुप्ता असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. त्यांना आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी दिलासा दिला. व्याज १ फेब्रुवारी २०१३ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, गुप्ता यांनी लॉर्ड लॅण्ड डेव्हलपरच्या मौजा नरसाळा येथील ले-आऊटमधील एक भूखंड सहा लाख रुपयात खरेदी करण्यासाठी २ नोव्हेंबर २०१० रोजी करार केला तसेच डेव्हलपरला अडीच लाख रुपये अदा केले. त्यानंतर डेव्हलपरने संबंधित ले-आऊट नागपूर सुधार प्रन्यासकडून मंजूर करून घेतले नाही. त्यामुळे गुप्ता यांनी डेव्हलपरला कायदेशीर नोटीस बजावून अडीच लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत मागितले. ती नोटीस डेव्हलपरने स्वीकारली नाही तसेच गुप्ता यांना त्यांची रक्कम परत केली नाही. परिणामी, गुप्ता यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यात आयोगाने जारी केलेली नोटीस तामील होऊनही डेव्हलपर आयोगासमक्ष हजर झाले नाही. त्यामुळे आयोगाने तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही करून रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर सदर निर्णय दिला.