सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णाला वाचविण्यासाठी औषधांपासून ते इतर साहित्य उपलब्ध करून देण्याऱ्या नातेवाईकांची धडपड मृत्यूनंतरही थांबत नसल्याचे धक्कादायक चित्र आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या नागपूरच्या मेडिकलमधील आहे. मृत्यूनंतर २१ दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करणे व प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक असताना, महिनोन्महिने होऊनही मृत्यू प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेला अर्जच रुग्णालयातून भरून दिला जात नसल्याचे वास्तव आहे. मेडिकल प्रशासनाच्या गलथानपणामुळे शेकडो नातेवाईकांना आप्तांचे दु:ख बाजूला सारून रुग्णालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे.शासनाने जन्म-मृत्यूची नोंदणी आवश्यक असल्याची अट घातली आहे. मृत्यूचा दाखला असेल तरच संपत्तीवरील हक्क सांगता येतो, याशिवाय अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजासाठी हा दाखला महत्त्वाचा ठरतो. पूर्वी हे दाखले महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातच मिळायचे. आता मनपाच्या दहाही झोनमधून मिळतात. संबंधित इस्पितळाचे दस्तऐवज पाहूनच मृत्यूचा दाखला तयार केला जातो. परंतु येथेच घोळ होत आहे. मेडिकलमध्ये दिवसाकाठी सुमारे चार-पाच रुग्णांचा मृत्यू होतो. ज्या वॉर्डात किंवा अतिदक्षता विभागात मृत्यू झाला तेथील डॉक्टरांना मृत्यू प्रमाणपत्रासाठी ‘अर्ज ४’ व ‘८’ भरून मेडिकलच्या अभिलेखागारमध्ये पाठविणे बंधनकारक असते. पूर्वी हे बंधन ७२ तासांचे होते नंतर २१ दिवसांचे करण्यात आले. अभिलेखागारमध्ये याची नोंद झाल्यावर हे अर्ज महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयात प्रमाणपत्रासाठी पाठिवले जातात. मात्र महिनोन्महिने हे अर्ज भरले जात नाही.
डॉक्टर-कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवीमेडिकलच्या अतिदक्षता विभागात ४ मार्च २०१८ रोजी पंचफुला जवादे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु मृत्यू प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेला अर्ज या विभागाने अभिलेखागार कक्षात पाठविलाच नाही. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचा मुलगा सुनील जवादे रुग्णालयाचे उंबरठे झिजवत आहे. ‘लोकमत’शी बोलताना सुनील म्हणाले, आईच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी मेडिकलच्या अभिलेखागार कक्षात गेल्यावर तेथील कर्मचारी अर्ज आले नसल्याचे सांगून ते अतिदक्षता विभागात पाठवितात. तेथील परिचारिका, कर्मचारी डॉक्टरांना भेटू देत नाहीत. हाकलून लावतात. गेल्या पाच महिन्यांपासून हेच सुरू आहे. दाद मागवी तरी कोणाकडे हा प्रश्न आहे.
अधिष्ठात्यांच्या निर्देशालाही ठेंगाया समस्येला घेऊन काही महिन्यांपूर्वीच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले अर्ज तातडीने भरून अभिलेखागार पाठविण्याचे लेखी निर्देश सर्व वॉर्ड व विभागाला दिले आहेत. परंतु अधिष्ठात्यांच्या या निर्देशालाही संबंधितांनी ‘ठेंगा’ दाखविला आहे.