लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वच बाजारपेठांमधील दुकाने ५ जूनपासून दिशेनुसार ऑड-इव्हन पद्धतीने सुरू आहेत. आता १ जुलैपासूनही याच पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. आधीच संकटात असलेले व्यापारी या नियमामुळे पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. बाजारपेठा अटी आणि नियमांतर्गत सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत खुल्या ठेवाव्यात आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी द होलसेल क्लॉथ अॅण्ड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार मदान यांनी एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.मदान म्हणाले, उन्हाळ्याचा खरा सीझन पूर्णपणे गेला आहे. व्यापाऱ्यांना कमाईपेक्षा खर्चच जास्त आहे. दुकाने ५ वाजेपर्यंत खुली असल्याने ग्राहकांना मनमोकळी खरेदी करता येत नाही. अन्य जिल्हे आणि बाहेरगावचे दुकानदार खरेदीसाठी नागपुरात येतच नाहीत. त्यांच्यासमोर खरेदीच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.दुकानदार आताही शासनाच्या अटी आणि नियमांचे पालन करीत व्यवसाय करीत आहेत. बाजारपेठ दररोज सुरू राहिल्यानंतरही पालन करतील. त्यामुळे दुकानात खरेदीदारांची गर्दी कमी राहील. खरेदीचा काळ आहे, पण ऑड-इव्हन पद्धतीमुळे दुकानदारांचे ठरलेले ग्राहक परत जात आहेत. ते अन्य दुकानातून खरेदी करीत आहेत. त्यामुळे दुकानदारांचा ग्राहक वर्ग त्यांच्यापासून दूर जात असून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अशा संकटाच्या स्थितीत संपूर्ण व्यापारी शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य केले आहे. कोरोनावर लस येईपर्यंत दुकानदारांना अशाच पद्धतीने जगावे लागणार आहे. दुकाने दररोज सुरू ठेवून प्रशासनाने व्यावसायिकांना मदत करावी.
नागपुरात ऑड-इव्हन पद्धतीने कापड दुकानदारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 10:10 PM