लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाला नागपुरातील लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी २२ लाख रुपयांचा फटका बसला. उत्पन्न अर्ध्यावर आले. रविवारीही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
नागपुरातील वाढत्या संक्रमणामुळे प्रशासनाने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर याचा अपेक्षित प्रतिकूल परिणाम झाला. नागपूर विभागामध्ये ६ एसटीचे डेपो आहेत. या सर्व डेपोंमध्ये झालेल्या नेमक्या नुकसानीची माहिती महमंडळाकडून संकलित केली जात आहे.
या संदर्भात नागपूरचे विभाग नियंत्रक नरेंद्र बेलसरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, लॉकडाऊन लक्षात घेता, आम्ही संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आधीच काळजी घेतली होती. विभागात रोज ४०० एसटी बसेसच्या फेऱ्या धावतात. मात्र, नुकसान टाळण्यासाठी शनिवारी १९० बसेस सोडण्यात आल्या. विभागातील बसेस दररोज १ लाख ४० हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करतात. तो कमी करून ६० हजार किलोमीटर करण्यात आला होता. यामुळे सर्व डेपो मिळून २० ते २२ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. दररोज हे उत्पन्न ४२ लाख रुपयांचे असते. त्यात निम्मी घट झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बाहेरच्या डेपोंमधून येणारी वाहने नागपुरात आली असली, तरी त्यांच्या फेऱ्याही घटलेल्या होत्या. अनेकांनी आपले प्रवासाचे नियोजन केल्यामुळे शनिवारी प्रवाशांची रोजच्या सारखी गर्दी नव्हती.
स्पर्धा परीक्षेसाठी जादा बसेस सोडणार
रविवारी स्पर्धा परीक्षांचे नियोजन आहे. परीक्षेच्या तारखा आधीच ठरल्या असल्याने, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ दिली जाणार नाही, असे नरेंद्र बेलसरे यांनी सांगितले. ते म्हणाले, परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व स्टॉफला तशा सूचनाही दिल्या आहेत.
खासगी प्रवासी सेवाही मर्यादित
लॉकडाऊनमुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांनीही आपल्या फेऱ्या शनिवारी घटविल्या होत्या. नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा-यवतमाळ यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या लांब पल्ल्याच्या खासगी प्रवासी सेवा चालविल्या जातात. सकाळच्या सत्रामध्ये बहुतेक ठिकाणांहून फेऱ्या आल्या. मात्र, १० वाजतानंतर ही संख्या कमी झालेली दिसली. उद्याही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.