रामटेक : रामटेक हे जागतिक कीर्तीचे ठिकाण आहे. हिरवीगार वनराई व उंचच उंच सातपुडा पर्वतरांगा. ठिकठिकाणी साैंदर्यात भर टाकणारे तलाव, कालिदासाचे वास्तव्य, प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श, नागार्जुन मुनीचे कर्मस्थान, जैन मंदिर अशा कितीतरी गोष्टींचा प्राचीन वारसा या तालुक्याला लाभला आहे. या ठिकाणचे साैंदर्य अधिक फुलावे म्हणून मनसर ते तुमसर हा रस्ता बनविण्यात येत आहे. मात्र हा मार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे साैंदर्यात भर घालण्यापेक्षा अश्रू ढाळत आहे! या रस्त्याचे काम ९५ टक्के संपले आहे. काही काम शिल्लक आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण शक्य होते. रस्त्याच्या मधोमध फुलझाडे लावता आली असती. दाेन्ही बाजूने लाईटची व्यवस्था, एका बाजूने दाेन गाड्या एकाच वेळी जाऊ शकल्या असत्या. वळण सरळ करता आले असते. दाेन्ही बाजूने जाळ्या लावता आल्या असत्या. या सर्वामुळे रस्त्याचे सौंदर्य फुलले असते. पण सध्या यापैकी काहीही हाेणार नाही.
राजकीय पुढाऱ्यांनी कुणी बॅरिकेड्स लावू नका, कुणी मधात येणारे झाडे ताेडू नका, रस्ता उंच करू नका, दाेन्ही बाजूने सर्व्हिस राेड बनवा, असा दबाव आणला. त्यामुळे काम थांबले. सर्व्हिस राेड तयार झाल पण रस्त्याचे काम हाेण्याअगाेदरच येथे अतिक्रमण झाले. सर्व्हिस राेड दुकानदाराच्या ताब्यात गेला. त्यामुळे सर्व्हिस राेड कुणासाठी बनविला, हे कळायला मार्ग नाही.
या रस्त्यावर बॅरिकेड्स अर्धे लागले. अर्धे तसेच राहणार आहे. काही ठिकाणी पाेलवर लाईट लावले, पण कुठे सुटले आहेत. मनसरजवळही वळण सरळ हाेऊ दिले नाही. कंपनीला त्यांच्या प्लॅननुसार काम करता आले नाही. रामटेकच्या बसस्थानक चाैकात साैंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तिथे फुलझाडे व हायमास्ट लावले जाणार आहे. पण यात बाजूच्या हाॅटेलची जागा जाणार आहे. तेथे अजून काय हाेईल, हे सांगता येत नाही.
या रस्त्याचे काम मनसर ते सालई ४२ कि.मी. बारब्रीक कंपनी करीत आहे. ४०० कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. पण रामटेकजवळ अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. रस्त्याचे काम सुरू हाेण्याआधी जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले नाही. त्यामुळे काम थांबले आहे. खिंडसीजवळ व नगारा तलाव क्षेत्रात काम थांबले आहे. नगारा तलावाजवळ बारई समाजाची जागा आहे. त्यामुळे हे काम अपूर्ण आहे. तसेच खिंडसीजवळ वन विभागाची जागा पाहिजे आहे. पण जागा न मिळल्याने तेथेही काम थांबले आहे. ही समस्या कधी सुटेल, काही सांगता येत नाही.