नागपूर : नातेवाईकाच्या लग्नासाठी काढलेले तब्बल सात तोळ्यांचे दागिने असलेली पिशवी लॉकरमध्ये जमा करायला जात असताना खाली पडली. ही बाब लक्षात येताच ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या काळजाचा ठोकाच चुकला. पोलिसांमध्ये तक्रार तर केली, मात्र इतके सोने परत मिळेल ही आशाच त्यांनी सोडून दिली होती. मात्र तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत दोन आठवड्यांत दागिने शोधले. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या वृद्ध व्यक्तीला संबंधित पिशवी सापडली होती, त्याने ती उघडूनदेखील पाहिली नव्हती.
अशोक श्रीराम खंडेलवाल (७३, राजेंद्रनगर, नंदनवन) यांचे इतवारीत लॉकर आहे. दोन महिन्यांअगोदर त्यांनी नातेवाईकाच्या लग्नासाठी दागिने काढले होते व ८ फेब्रुवारी रोजी ते दागिने परत लॉकरमध्ये ठेवायला चालले होते. टांगा स्टॅंड चौकात त्यांच्या हातातील पिशवी खाली पडली व त्यातील लेडीज पर्समध्ये प्रत्येकी तीन तोळ्यांचे दोन नेकलेस व एक तोळ्याची कर्णफुले होती. त्यांची किंमत अंदाजे ३.८५ लाख इतकी होती. त्यांनी खूप शोधाशोध केली, मात्र पिशवी आढळली नाही. त्यामुळे हताश होऊन त्यांनी तहसील पोलीस ठाण्यात दागिने हरविल्याची तक्रार दिली. त्यांनी दागिने परत मिळण्याची आशाच सोडली होती.
दरम्यान ती पिशवी महालातील शिवाजीनगर भागातील एका ७० वर्षीय वृद्धाला दिसली व त्याने ती घरी जाऊन ठेवून दिली. त्याला त्याचा विसरदेखील पडला. दरम्यान तहसील पोलीस ठाण्यातील पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला असता संबंधित पिशवी वृद्ध घेऊन जाताना दिसला. त्यानंतर इतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याच्या जाण्याचा मार्ग शोधला असता तो महालमध्ये गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने संबंधित भागात जाऊन तपास केला असता संबंधित वृद्ध आढळला. त्याला विचारणा केली असता त्याने पिशवी सापडल्याचे सांगितले व लगेच घरातून आणूनदेखील दिली. त्यात दागिने मूळ अवस्थेतच होते.
पोलिसांनी खंडेलवाल यांना फोन करून दागिने खातरजमा करण्यासाठी बोलविले. आपले हरविलेले दागिने पाहून खंडेलवाल यांच्या आनंदाला पारावाराच राहिला नाही. पोलिसांनी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना दागिने सुपूर्द केले. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, विनायक कोल्हे, संदीप बागुल, शंभुसिंह किरार, अनंत नान्हे, यशवंत डोंगरे, पंकज बागडे, पंकज निकम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.