नागपूर : फासस्टॅग रिचार्जसाठी ॲपवर डेबिट कार्डचे तपशील टाकणे एका महिलेला महागात पडले. अज्ञात आरोपीने ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या खात्यातील पावणे तीन लाख रुपये उडविल्याची घटना सिव्हील लाईन्स परिसरात घडली.
सिव्हील लाईन्स येथील निवासी सोनाली मुकुंद कनकदंडे यांना त्यांच्या कारसाठी फास्टटॅग रिचार्ज करायचे होते. यासाठी त्यांनी मोबाईलवरूनच गुगलवर सर्च केले व समोर आलेले ॲप डाऊनलोड केले. संबंधित ॲपवर त्यांनी डेबिट कार्डचे तपशील टाकले. फास्टटॅग रिचार्जदेखील झाले.
काहीवेळाने त्यांनी नेटबॅंकिंगच्या माध्यमातून खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘युझर आयडी इन हॅंडलिंग’ असा संदेश आला. त्यांनी तातडीने कस्टमर केअरशी संपर्क साधला असता काही वेळेतच त्यांच्या खात्यातून २ लाख ७५ हजारांची रक्कम दुसऱ्या एका खात्यात वळती झाल्याची बाब समोर आली. हे कळताच सोनाली यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आयटी ॲक्टअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.