उदय अंधारे
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास लुप्तप्राय झालेले ‘इको रेस भंडारा’ नावाचे टसर रेशीम वाण आता नव्याने फुलणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. दीपक बारसागडे आणि संशोधकांच्या प्रयत्नांमुळे हे वाण ना केवळ पुनरुज्जीवित झाले, तर वाढलेसुद्धा. या संशाेधकांनी वाणाची लागवड पाच टक्क्यांवरून साठ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.
कधीकाळी हे टसर मागासलेल्या जिल्ह्यातील आदिवासींचे उत्पन्नाचे साधन हाेते. मात्र, काळानुसार ते लयाला गेले. डाॅ. बारसागडे व त्यांच्या टीमने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान मिशनअंतर्गत मंजूर प्रकल्पातून परिवर्तन घडविले. गडचिराेलीच्या शिरपूर, पेंढरी, सूर्याडाेंगरी आणि जंगलातील इतर गावांतील आदिवासींकडून अर्जुन व येन झाडावर टसर रेशीम अळ्यांची निर्मिती केली जाते.
टसर रेशीम संवर्धनाचे चार टप्पे
- जनजागृतीच्या अभावामुळे आदिवासी लाेक १०० टक्के रेशीम कोष बाजारात विक्रीला नेत हाेते. यामुळेच टसर रेशीम अळ्यांच्या प्रजाती धाेक्यात आल्या.
- संवर्धनाचे पहिले पाऊल म्हणून आदिवासींना केवळ ७० टक्के कोष विक्रीला नेऊन उर्वरित ३० टक्के संतती वाढविण्यासाठी राखून ठेवण्यास सांगितले.
- दुसऱ्या टप्प्यात टसर कोष आणून विद्यापीठाच्या प्रयाेगशाळेत ठेवून पालणपाेषण केल्यानंतर रेशमाचे पतंग मुक्त करण्यात आले.
- प्रयाेगशाळेत प्रजनन घडवून अंडी शेतकऱ्यांना पुरविली. अर्जुन व येन झाडावर अंडी साेडल्यावर अळ्या बाहेर पडल्या. त्यांनी स्वत:भोवती केलेल्या कोषमधील धाग्याची लांबी १ हजार मिमी आहे.
- तिसऱ्या टप्प्यात लाेकांना नैसर्गिक परिस्थितीत अळ्यांचे शत्रू कीटकांपासून संरक्षण करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. बांबू बास्केटमध्ये कोष व अळ्यांचे जतन व संवर्धनासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
शेतकरी दरवर्षी २० हजार कमावू शकतात
एक रुपया प्रतिकोष यानुसार आदिवासी कुटुंबांनी वर्षाला २० हजार कोष जमा केले, तर २० हजार रुपयांचे उत्पन्न हाेऊ शकते. सध्या भंडारा जिल्ह्यातील १०० आदिवासींनी या प्रकल्पातून लाभ मिळविला आहे.
इकाे रेस भंडारा वाणाला सुगीचे तीन हंगाम असतात. जून ते ऑगस्टमध्ये पहिला, सप्टेंबर ते नाेव्हेंबरमध्ये दुसरा, तर हिवाळ्याची सुरुवात व अंतापर्यंत तिसरा हंगाम असताे. नैसर्गिक परिस्थितीत एक पतंग १५० ते २०० अंडी घालते. मात्र, प्रयाेगशाळेत एका पतंगाच्या २०० अंड्यांमधून १६० अळ्या व ८० कोषांची निर्मिती शक्य आहे.
- डाॅ. दीपक बारसागडे, माजी प्रमुख, प्राणिशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ