अशोक हटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गाई-म्हशी पाळणे, दुग्धव्यवसाय करणे म्हणजे मोठा यक्ष प्रश्नच उभा ठाकतो, त्यापेक्षा ५-१० हजारांची नोकरी बरी, असाच सूर आज तरुण बेरोजगारांमध्ये दिसून येतो. शेतकरी या धंद्याला जोडधंदा म्हणून करण्यास मागे-पुढेच पाहताना दिसतात. अशा उद्योगांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांसमोर नागपूर तालुक्यातील कोदामेंढीनजीकच्या राजोली येथील एका ३५ वर्षीय नीतेश फत्तूजी पुरी या तरुणाने प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे. घरी शेती नसतानाही शेतीपूरक दुग्धव्यवसाय उभारून उद्योग क्षेत्रात त्याने भरारी घेतली आहे.जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर यश हमखास मिळेतच, या वाक्याला नीतेशने खरे ठरविले आहे. साडेचार हजार रुपयांप्रमाणे दोन भाकड गाई घेऊन १५ वर्षांपूर्वी या क्षेत्रात पाऊल टाकले. आज २० जर्सी गाईपर्यंत त्याने आपली वाटचाल नेली आहे. दररोज ४०० लिटर दुधापासून ३५ रुपये प्रति लिटर भावाने १४,००० रुपये मिळत आहे. दूध व दराबाबत हल्दीराम कंपनीशी करार केला आहे. विशेष म्हणजे नीतेशकडे शेती नाही. त्यामुळे जनावराच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होत होता. हिरवा चारा निर्माण करण्यासाठी त्याने चार एकर शेती भाड्याने घेतली आहे. प्रति एकर १७ हजार रुपये वर्षाकाठी भाडे दिले जाते. गार्इंसाठी त्याने फोमच्या गाद्यांची व्यवस्था केली आहे. गाई अमेरिकन ब्रीडच्या होलीस्टेन जातीच्या असल्याने सरासरी प्रत्येक गाईचे दूध ४० लिटरच्या जवळपास काढले जाते, असेही नीतेशने सांगितले.कुटुंबातील सर्व सदस्य आळीपाळीने गार्इंच्या सेवेत असतात. घर व गोठा एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे २४ तास आमचा हा परिवार एक दुसºयासोबत असतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मिळकत एक हजारावर येत असल्याने सर्व सदस्य आपली जबाबदारी अत्यंत जिव्हाळ्याने पार पाडत असल्याचे तो म्हणाला.वीज बिलाची होणार बचतगोबर गॅस तयार करून वीज वापरण्याचा विचार त्याने व्यक्त केला. उन्हाळ्यात १० ते १२ हजार रुपये महिन्याकाठी वीज बिल येते. हिवाळा व पावसाळ्यात सात हजारांपर्यंत बिल येते. यावर पर्याय म्हणून गोबर गॅसचा वापर करून वर्षाकाठी एक लाख रुपयाची बचत करण्याचा मनोदय नीतेशने व्यक्त केला. तसेच आता ग्रामीण भागातही सेलिब्रेशन हॉल, हॉटेलिंगला मोठा वाव असल्याने दुधापासून खवा, पनीर व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वाव आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ करता येऊ शकते, असे सांगत शेतकऱ्यांनी या जोडधंद्याकडे वळावे, असेही नीतेशने सांगितले.
दोन भाकड गायींपासून ते २० दुभत्या गायींपर्यंतची झेप; नागपूरच्या तरुणाची यशोगाथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:48 AM
उद्योगांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांसमोर नागपूर तालुक्यातील कोदामेंढीनजीकच्या राजोली येथील एका ३५ वर्षीय नीतेश फत्तूजी पुरी या तरुणाने प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे.
ठळक मुद्देशेती नसताना केला शेतीपूरक व्यवसाय