कामठी : ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर भाजपने महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली आहे. अशात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कामठी तालुक्यातील गुमथळा जि.प. सर्कलमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार योगेश डाफ यांना उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत पक्षाचा ‘बी’ फाॅर्म मिळाला नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी छाननीअंती वैध ठरत ‘अपक्ष’ म्हणून ग्राह्य धरण्यात आला. भाजपचे दोन बंडखोर उमेदवार रिंंगणात असलेल्या या सर्कलमध्ये जि.प. निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हावर एकही उमेदवार नसेल, हे निश्चित.
जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांना उमेदवारी नाकारात भाजपने गुमथळा सर्कलमध्ये योगेश डाफ यांना संधी दिली. सोमवारी डाफ यांना उमेदवारी अर्ज सादर करेपर्यंत पक्षाचा अधिकृत ‘बी’ फाॅर्म मिळाला नाही. शेवटी त्यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी छाननीअंती तो वैध ठरला. मात्र, अर्जासोबत ‘बी’ फॉर्म नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ‘अपक्ष’ म्हणून ग्राह्य धरला.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डाफ यांच्यासह अनिल निधान व कैलास महल्ले यांनीही भाजप उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोघांच्याही अर्जासोबत ‘बी’ फाॅर्म नव्हता. त्यांचेही उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले असून, त्यांना ‘अपक्ष’ उमेदवार म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे. गुमथळा सर्कलच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये राजकीय वादंग रंगले असताना जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी डाफ हेच भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचे सोमवारी सायंकाळी जाहीर केले होते; परंतु दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांना पक्षाचा ‘बी’ फाॅर्म देण्यात आला नव्हता. आता निधान आणि महल्ले उमेदवारी अर्ज मागे घेतील की मैदानात कायम राहतील, याकडे तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत.
--
गुमथळा सर्कलसाठी भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांनी पक्षाचा अधिकृत ‘बी’ फॉर्म अर्जासोबत जोडला नसल्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेश नियमानुसार तीनही उमेदवारांना अपक्ष उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
अरविंद गजभिये, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, कामठी
---
सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध
कामठी तालुक्यातील गुमथळा व वडोदा जिल्हा परिषद सर्कल, तर महालगाव, बीडगाव पंचायत समिती गणासाठी पोटनिवडणूक होत आहे. तीत गुमथळा जि.प. सर्कलमधून ८, वडोदा जि.प. सर्कलसाठी ७, महालगाव पंचायत समिती गणासाठी ४, तर बीडगाव पंचायत समिती गणासाठी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती सर्वांचे अर्ज वैध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.