नागपूर : एका गाेत्रात लग्न करण्याला परवानगी नसताना, ‘ति’चे मात्र गाेत्रातील माणसांशी प्रेम जुळले आणि समाज तिच्या जीवावर उठला. अशात नात्यातील महिलेच्या मदतीने पळून जाऊन त्यांनी लग्नही केले. मात्र, लग्नानंतर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि पुन्हा तिच्यावर संकट काेसळले. त्या आदिवासी जमातीत आणखी एक मान्यता हाेती. माणसाला जुळी मुले हाेऊच शकत नाहीत आणि झालीच, तर ती अनैतिक संबंधाने किंवा प्राण्यांशी सहवास केल्याने. समाजाने तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली आणि त्यातच तिचा बळी गेला. ही कथा आहे दीडशे वर्षापूर्वीची परंपरा दर्शविणाऱ्या ‘गाेत’ चित्रपटाची.
ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने प्रदर्शित हा चित्रपट प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. परंपरेच्या माध्यमातून कायम महिलांनाच अग्निपरीक्षा द्यावी लागत असल्याचे सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून नागपूरकर दिग्दर्शक शैलेंद्र बागडे यांनी अधाेरेखित केले आहे. नागपूर महानगरपालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्या वतीने, तसेच सप्तक व पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या सहकार्याने दोन दिवसीय पाचव्या ‘ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी माजी महापाैर नंदा जिचकार, फिल्म गुरू समर नखाते, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर मेश्राम, पुण्याचे आयकर अधिकारी व चित्रपट दिग्दर्शक विठ्ठल भोसले, तसेच सप्तकचे विलास मानेकर, नितीन सहस्त्रबुद्धे, रवींद्र डाेंगरे, उदय पाटणकर आदी उपस्थित हाेते. यावेळी ‘गोत’चे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे व टीमचा सत्कार करण्यात आला.
आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सीस्टिम लिमिटेडच्या कविकुलगुरू कालिदास सभागृहामध्ये शनिवारी गाेतसह आणखी दाेन चित्रपटांचे प्रदर्शन झाले. यामध्ये संचारबंदीमध्ये मुलाची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी धडपडणाऱ्या दाेन महिलांची व्यथा मांडणाऱ्या इजिप्तच्या ‘कर्फ्यू’ या चित्रपटासह जापानी भाषेतील ‘ट्रू मदर’ या चित्रपटाचाही समावेश हाेता.
प्रास्ताविकामध्ये डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी महोत्सवाची संकल्पना विशद केली. देश-विदेशातील हजारांवर चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट आठ चित्रपटांची या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संचालन डॉ.रश्मी पारस्कर सोवनी यांनी केले. आभार डॉ.उदय ब्रह्मे यांनी मानले.