नागपूर : आठ महिन्यांपासून झारखंड राज्यातील रांचीमधील अरगोरा येथील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे नागपुरातील एका युवकाशी इन्स्टाग्रामवर प्रेम जुळले. प्रियकराला भेटण्यासाठी ती शाळेतून घरी परत न जाता थेट नागपुरात आली; परंतु, तिच्या मोबाइल लोकेशनवरून नागपूर पोलिसांनी प्रियकर आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन केले.
झारखंडमधील रांची जिल्ह्यातील अरगोरा येथील मयुरी (बदललेले नाव) ही १५ वर्षांची मुलगी दहावीला शिकते. मयुरीच्या घरातील वातावरण गंभीर आहे; परंतु, तिला मोकळ्या वातावरणात जगण्याची आवड आहे. शुक्रवारी ती शाळेत गेली. शाळा सुटल्यानंतरही मयुरी ती घरी न परतल्यामुळे तिच्या वडिलांनी अरगोरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
अरगोरा पोलिसांनी मयुरीच्या मोबाइलचे लास्ट लोकेशन तपासले असता ती नागपूरला असल्याचे समजले. त्यामुळे अरगोरा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रेम प्रकाश यांनी नागपुरात गुन्हे शाखेला फोनवरून संबंधित मुलीच्या शोधासाठी माहिती दिली. गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मयुरीचा शोध घेतला असता ती गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तिच्या इन्स्टाग्रामवरील मित्राच्या घरी आढळली.
तिचा इन्स्टाग्रामवरून प्रेम झालेला प्रियकर बारावी शिकलेला आहे. तो नागपुरात एका काचेच्या दुकानात काम करतो. दोघांना ताब्यात घेऊन मुलीची चौकशी केली असता मागील आठ महिन्यांपासून आपली इन्स्टाग्रामवर ओळख झाल्याचे तिने सांगितले. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी घरी कोणालाही न सांगता आपल्या इच्छेने नागपुरात आल्याचे मयुरी म्हणाली. त्यानंतर मयुरी आणि तिच्या इन्स्टाग्रामवरील मित्राला गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक समाधान बजबळकर, उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबुसकर, ज्ञानेश्वर ढोके, मनिष पराये, दीपक बिंदाने, शरीफ शेख, ऋषीकेश डुमरे, आरती चौहान, अश्विनी खोडपेवार यांनी केली.