नागपूर : मंगळवारी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने शहरात प्रेमोत्सवाला बहर आला होता. ठिकठिकाणी तरुण-तरुणी बागडताना दिसत होते. गुलाबाचे फूल, ग्रिटिंग कार्ड्स हातात घेऊन आपल्या प्रेमाचा इजहार करत होते. काही तरुण-तरुणी ‘व्हॅलेंटाइन वीक’मधली सारी कसर एकाच दिवशी काढताना गुलाबपुष्प, चॉकलेट्स, टेडी बिअर भेट देताना आलिंगन आणि किस घेताना दिसत होते. एकूणच काय तर व्हॅलेंटाइन डेला शहरातील तरुणाईच्या प्रेमाला धुमारे फुटले होते आणि प्रेमी युगुलांसाठी तर हा दिवस म्हणजे उत्सवच असल्याचा भास होत होता. सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत होता आणि प्रेमदिनाचा उत्सव धडाक्यात साजरा होत होता.
प्रेम विरुद्ध संस्कृती रक्षक
- ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे प्रेमीयुगुल विरूद्ध संस्कृती रक्षक असा संघर्ष दरवर्षी दिसायला लागला आहे. यात बळाने विचार केल्यास संस्कृती रक्षक कायम मजबूत दिसत असतात आणि त्यांच्या कोपाला बरेच युगुल तर कधी मित्र-मैत्रीणही पडत असते. अधामधात बहीण-भाऊही या संघर्षात अनवधानाने बळी पडत असल्याचे दिसले आहे. मात्र, प्रेम बळाने अशक्त दिसत असला तरी भावनेने समृद्ध आणि बलशाली असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रेमाच्या नावाने अश्लील चाळे करणाऱ्यांमुळे प्रेमीयुगुल कायम बदनाम झाले आहेत. त्याचा प्रत्यय मंगळवारीही दिसून आला. अनेक ठिकाणी काही युगुल उघड्यावरच अश्लील चाळे करताना आढळून आले. संस्कृती रक्षकांनी त्यांना पिटाळूनही लावले.
शहराबाहेर पलायन!
- शहरातील अनेक उद्यानांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने व संस्कृती रक्षकांच्या धास्तीपोटी गोळा होण्यास मज्जाव होता. तरीदेखील तरुणाईचा उत्साह मावळला नव्हता. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी दरवर्षी घडणारे प्रताप एव्हाना सर्वत्र परिचित झाल्याने, पूर्वनियोजनानुसार प्रियकर-प्रेयसी, मित्र-मैत्रिणींचे घोळके शहराबाहेर पसार झाले होते. शहरानजीक असलेले वन-डे पिकनिक स्पॉट जसे हिंगणा वॉटरफॉल, मोहगाव झिल्पी, बोरगाव धरण, रामटेक, खिंडसी, पेंच आदी स्थळांकडून सर्वांनी प्रयाण केले होते. संध्याकाळ होताच सारे परतणार होते.
बजरंग दलाने निर्माण केली दहशत
- बजरंग दल, महानगरच्या वतीने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आदल्या दिवशीच म्हणजे सोमवारीच इशारा रॅली काढण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी छावणी येथील दुर्गा मंदिरातून ही रॅली काढली. शहरातील प्रत्येक चौक, बागेच्या द्वारावर जाऊन त्यांनी संस्कृती रक्षणाचे जोरदार समर्थन करत पाश्चिमात्य व्हॅलेंटाइन डे व त्या निमित्ताने होणाऱ्या अश्लील चाळ्यांचा विरोध केला आणि विरोधी घोषणाही दिल्या. कार्यकर्त्यांनी यावेळी व्हॅलेंटाइन डेची शुभेच्छापत्रके जाळून जोरदार निषेध व्यक्त केला.
नागपूर पोलिसांचे ट्वीट जोरदार
- ‘चॉकलेट, टेडी, प्रॉमिस हे सारेच अस्थिर आहेत. परंतु, नागपूर पोलिस तुमच्यासाठी सदैव पर्मनन्ट आहेत’ असे नागपूर पोलिसांकडून करण्यात आलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरला. एकप्रकारे, प्रेम असो वा सुरक्षा याबाबत सदैव एकनिष्ठ राहा, असाच सल्ला नागपूर पोलिसांनी या ट्वीटमधून दिला.
सजले गुलाबपुष्पाची दुकाने
- ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पर्वावर फुलविक्रेत्यांकडे गुलाबाच्या फुलांचा मोठा साठा अवतरला होता. शिवाय, गुलाबफुलांच्या विक्रीचे स्पेशल स्टॉल्सही लागले होते. वेगवेगळ्या शैलीतील पुष्पगुच्छ आकर्षणाचे केंद्र ठरले. ग्रिटिंग कार्डच्या दुकानातही वेगवेगळ्या मजकुरांचे ग्रिटिंग आकर्षक ठरत होते.
हॉटेल्स, रेस्टेराँमध्ये जोरदार तयारी
- प्रेमदिनाच्या निमित्ताने हॉटेल व रेस्टेराँमध्ये जोरदार सजावट करण्यात आली होती. दिवसभर अनेक युगुल व मित्र-मैत्रिणींचे घोळके हॉटेल-रेस्टेराँमध्येच बसलेले दिसले. शिवाय, संध्याकाळच्या सुमारात विविध संस्था व ओपन गार्डन रेस्टेराँमध्ये स्पेशल व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते.