नरेंद्र कुकडे
हिंगणा (नागपूर) : तरुण व तरुणीने गुरुवारी (दि. १) हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरील खापरी ते गुमगावदरम्यानच्या संदेश सिटीजवळ आत्महत्या केली. त्या दोघांची ओळख पटली असून, ते दोघेही नातेवाईक होते. त्यांचे आपसात प्रेमसंबंध होते. शिवाय, त्यांना लग्न करावयाचे होते. मात्र, नातं आड येत असल्याने समाज आपल्याला स्वीकारणार नाही, याची जाणीव दोघांनाही असल्याने त्यांनी सोबत आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
जितेंद्र काशिराम नेवारे (३५, रा. बाबा फरीदनगर, मानकापूर, नागपूर) व स्वाती पप्पू बोपचे (१९, रा. तुमखेडा, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) अशी मृतांची नावे आहेत. स्वाती ही जितेंद्रच्या मावस भावाची मुलगी होय. जितेंद्रची पत्नी वर्षभरापूर्वी त्याला सोडून माहेरी गेल्याने आईसोबत एकटाच राहायचा व पाण्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा. नात्यामुळे स्वाती अधूनमधून पाहुणी त्याच्याकडे नागपुरात यायची. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे तो तिला भेटायला गोंदियाला जायचा.
जितेंद्र तिला भेटून मंगळवारी (दि. ३०) नागपूरला परतला होता. त्यानंतर बुधवारी (दि. ३१) ती नागपूरला आली. दोघेही दिवसभर सोबत होते. त्यानंतर गुरुवारी (दि. १) सकाळी ८ वाजेच्या सुमारास दाेघांचेही मृतदेह रेल्वेलाइनवर आढळून आले. दरम्यान, दोघांचे मोबाइल फोन नॉट रिचेबल होते. त्यांच्यातील संबंधाची माहिती नसल्याने जितेंद्रची आई लक्ष्मी हिने तो बेपत्ता असल्याची तक्रारदेखील पोलिसांत नोंदविली नव्हती. मृत स्वातीचे कुटुंबीय शनिवारी (दि. ३) नागपुरात येणार असल्याची माहिती ठाणेदार तथा तपास अधिकारी विशाल काळे यांनी दिली.
मोबाइल फोनचा मदर बोर्ड आला कामी
पोलिसांनी घटनास्थळाहून त्यांच्या साहित्यासह तुटलेला एक मोबाइल फोन जप्त केला. ठाणेदार विशाल काळे यांनी सायबर सेलच्या मदतीने त्या फोनच्या मदर बोर्ड आधारे त्यात वापरला गेलेला मोबाइल क्रमांक मिळवला. मोबाइल क्रमांक मिळताच तो जितेंद्र नेवारे याच्या नावे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विशाल काळे यांनी जितेंद्रचे घर गाठून त्याच्या आईला घटनास्थळी आढळून आलेल्या चपला व इतर साहित्य दाखविले. मदर बोर्डच्या आधारे दोघांचीही ओळख पटली.