नागपूर : ‘इन्स्टाग्राम’वरून झालेल्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर प्रियकरासाठी घर सोडून पळ काढणाऱ्या तरुणीला मोठ्या विश्वासघाताचा सामना करावा लागला. पळ काढल्यानंतर प्रियकराने शारीरिक अत्याचार केले व अखेर लग्नाला नकार दिला. ज्याच्यासाठी जन्मदात्यांना सोडले त्याने असा प्रकार केल्याने तरुणीने हिंमत करत पोलिस ठाणे गाठले व त्याच्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्रशांत गजानन पारधी (२३, सुखनगर सोसायटी, वाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलीशी ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना मोबाइल क्रमांक दिले व ते फोनवर संवाद साधू लागले. यात त्यांची मैत्री झाली व पुढे त्याची परिणती प्रेमात झाली. प्रशांतने तिला प्रेमाच्या जाळ्यात असे फसविले की तिला आणखी काही सुचेनासेच झाले. त्याने तिला तू घरून पळून ये, आपण लग्न करू असे म्हटले व ती खरोखरच घरून पळून गेली. १८ एप्रिल रोजी ते दोघेही एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये थांबले.
शारीरिक अत्याचार, धमकीही...
या कालावधीत आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. तिने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला व तिने याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे ती हादरली व ती कशीबशी घरी परत गेली. अनेक दिवस ती मानसिक धक्क्यातच होती. अखेर तिने हिंमत करून एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रशांतविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.