लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुरावलेली मैत्रिण दुसऱ्या एका तरुणासोबत दिसल्याने संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने तिला कारने चिरडून ठार मारले. आरोपींनी भरधाव कारची दुचाकीला मागून जोरदार धडक मारल्याने दुचाकीचालक तरुणही गंभीर जखमी झाला. रविवारी पहाटे गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. मयुरी तरुण हिंगणेकर (वय २५) असे मृत तरुणीचे नाव आहे. जखमी तरुणाचे नाव अक्षय किशोर नागरगणे असून, या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव अनिकेत कृष्णाजी साळवे (वय २३, रा. छोटा लोहारपुरा, गणेशपेठ) तर त्याच्या साथीदारांची नावे मोहित साळवे (लोधीपुरा, गणेशपेठ), आशिष साळवे आणि दीपक मुळे (महाल) अशी आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मयुरी हिंगणेकर ही गणेशपेठमधील तेलीपुऱ्यात राहत होती. काही अंतरावरच आरोपी राहत असल्याने आरोपी अनिकेतसोबत तिची मैत्री होती. आरोपी तिच्यावर नेहमी संशय घेत असल्याने त्यांचे महिनाभरापूर्वी मैत्रीसंबंध संपुष्टात आले. तेव्हापासून तो मयुरीच्या मागावर होता. शनिवारी मध्यरात्री अनिकेत त्याच्या उपरोक्त साथीदारांसोबत पार्टी करीत असताना त्याला मयुरी तिचा मित्र अक्षय नागरगणेसोबत कोराडीकडून दुचाकीवर (एमएच ३१/सीजे १८७२) येताना दिसली. त्यामुळे आरोपी अनिकेत साळवे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या पोलो कार (एमएच ३१/डीव्ही ४९९०) मधून मयुरी आणि अक्षयचा पाठलाग करून त्यांना मीठा निम दर्ग्याजवळ (सीताबर्डीकडे जाताना) अडवले. यावेळी शुभमने मयुरीला एवढ्या रात्री कुठून येत आहे आणि हा कोण आहे, अशी विचारणा करून वाद घातला. अक्षयने प्रसंगावधान राखत तेथून मयुरीला घेऊन धूम ठोकली. मात्र, आरोपींनी पाठलाग करून त्यांना सीताबर्डीतील फॅशन स्ट्रीटजवळ अडवले. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. अक्षयसोबत मयुरीचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय आल्याने चारही आरोपींनी तिला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. अक्षयने कशीबशी वेळ मारून नेत मयुरीला दुचाकीवर बसवले आणि तो तिला घरी सोडून देण्यासाठी निघाला. मयुरीवर एकतर्फी प्रेम करणाºया आरोपीने रागाने बेभान होऊन अक्षयच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. त्यांना गांधीसागर तलावाच्या वळणावर कारने जोरदार धडक मारली. ही धडक एवढी जबरदस्त होती की मागे बसलेली मयुरी कारच्या धडकेत खाली पडून चिरडली गेली. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला तर अक्षय गंभीर जखमी झाला. धडक मारल्यानंतर आरोपींनी खाली उतरून शिवीगाळ करत आरडाओरड केली. यावेळी पहाटेचे १.३० ते २ वाजले होते. दरम्यान, अपघातानंतर झालेला जोरदार आवाज तसेच आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. प्रारंभी हा अपघात असल्याचा अंदाज बघ्यांनी लावला. मात्र, आरोपी शिवीगाळ करीत असल्याने प्रेमप्रकरणाचा त्यांना संशय आल्याने त्यांनी लगेच गणेशपेठ पोलिसांना कळविले. दरम्यान, जखमी अक्षयला मेडिकलमध्ये हलविण्यात आले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी धावपळ करून कारचा शोध घेतला. आरोपी अनिकेतलाही ताब्यात घेण्यात आले. अन्य तिघे फरार आहेत. पोलीस उपनिरीक्षक आत्राम या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सानिका प्रकरणाच्या आठवणी ताज्याया थरारक हत्याकांडामुळे बजाजनगरातील सानिका थूगावकर हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अशाच प्रकारे एकतर्फी प्रेमातून खामल्यातील रोहित हेमनानी (बोलानी) नामक माथेफिरूने चाकूहल्ला करून सानिका प्रदीप थूगावकर (वय १८) हिची हत्या केली होती. १ जुलैला रात्री ७.४५ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या आठ रस्ता चौकाजवळ ही थरारक घटना घडली होती. गंभीर जखमी झालेल्या सानिकाने तब्बल अडीच महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २० सप्टेंबरला जीव सोडला होता.
वडिलांचे श्राद्ध आणि तिचा मृत्यूविशेष म्हणजे, शनिवारी मयुरीच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होते. त्यामुळे मयुरीची आई पुष्पा यांनी घरी पूजा ठेवली होती. ती आटोपल्यानंतर मयुरी घरून बाहेर पडली आणि घरी परत येण्यापूर्वीच तिचा आरोपींनी घात केला. यासंबंधाने गणेशपेठ पोलिसांकडे रात्रीपर्यंत विस्तृत माहिती उपलब्ध नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार, मयुरीचे यापूर्वी शुभम नामक तरुणाशी प्रेमसबंध होते. अनिकेत आणि शुभम हे घनिष्ट मित्र असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या हत्याकांडात शुभमची भूमिका काय आहे, ते तपासणे गरजेचे झाले आहे. दुसरे म्हणजे, अपघातानंतर जमावाने सर्व आरोपींना पकडून त्यांची धुलार्ई केल्याचीही माहिती आहे. पोलिसांनी मात्र त्यांना वेळीच का ताब्यात घेतले नाही, ते कळायला मार्ग नाही.