दयानंद पाईकराव
नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत २३ वर्षाच्या प्रियकराने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत मंदिरात लग्न करून ते सोबत राहत होते. सुखाचा संसार सुरू असताना ती गर्भवती झाल्याने ते रुग्णालयात गेले अन् ती अल्पवयीन असल्यामुळे प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
निलेश किशोर धनविजय (वय २३, रा. पाचपावली) याचे दहावीला शिकत असलेल्या एका १७ वर्षांच्या गौरीसोबत (बदललेले नाव) प्रेमसंबंध झाले. निलेश पेंटींगचे काम करतो. निलेशला वडील नाहीत, तर गौरीला आईवडील दोन्ही नाहीत. ती आपल्या काकूकडे राहत होती. दोघांनीही एका मंदिरात जाऊन एकमेकांच्या गळ्यात हार टाकून लग्न केले.
२५ ऑगस्ट २०२२ ते १९ जून २०२३ दरम्यान ते सोबत राहत होते. लग्नानंतर निलेशने गौरीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यामुळे ती गर्भवती राहिली. ती उपचारासाठी मेयो रुग्णालयात गेली. तेथे ती अल्पवयीन असताना गर्भवती राहिल्याची बाब डॉक्टरांच्या लक्षात आली. त्यांनी पाचपावली पोलिसांना याची सूचना दिली. पाचपावली ठाण्याचे उपनिरीक्षक सुजीत चव्हाण यांनी आरोपी प्रियकराविरुद्ध कलम ३६३, ३७६ (२), (एन) सहकलम ४, ८ पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.