नागपूर : एका महिलेसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणाचा तिच्याच घरी मृत्यू झाला. या प्रकरणात त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे गूढ कायम असून, पोलीस आत्महत्या व हत्या अशा दोन्ही दिशेने तपास करीत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित नावाच्या तरुणाचे प्रतापनगर येथील महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मागील अनेक वर्षांपासून ते ‘लिव्ह इन’मध्ये राहत होते. तो अनेकदा तिच्या घरीदेखील जायचा. रविवारी दुपारी दोन वाजता महिला आपल्या मुलीसह सीताबर्डी येथे खरेदीसाठी गेली होती. बाहेर जात असताना तिने घराला कुलूप लावले नव्हते.
सायंकाळी ५ वाजता महिला परतली तेव्हा बेडवर तरुण मृतावस्थेत आढळून आला. तिने तातडीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपासाला सुरुवात केली आहे. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, ही बाब शवविच्छेदनातूनच समोर येईल. तो महिलेच्या घरी नेमका कधी आला, त्याने कुठले औषध प्राशन केले होते की हा घातपाताचा प्रकार आहे, या बाबी तपासानंतरच स्पष्ट होतील.