लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर प्रदेशातील तरुण तसेच नागपुरातील तरुणीच्या लव्हस्टोरीतून जरीपटक्यातील दरोडा घडल्याची थक्क करणारी माहिती पुढे आली आहे. निवृत्त आर्मी अधिकाऱ्याची मुलगी हा दरोडा घालणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराची प्रेयसी आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात ती सहभागी आहे किंवा नाही, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, हा गुन्हा घडण्यामागे तीच आहे अन् तिच्याचमुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहे. एखाद्या टीव्ही सीरियलमध्ये शोभावी अशी या दरोड्याच्या घटनेची पार्श्वभूमी आहे.
मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले आणि आर्मीतून निवृत्त झालेले एक अधिकारी जरीपटक्यात स्थायिक झाले आहे. सोमवारी अवनी ज्वेलर्समध्ये पडलेल्या दरोड्याचा सूत्रधार पांडे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. त्याची या अधिकाऱ्याच्या कुटुंबासोबत ओळख आहे आणि मुलीसोबत (शैला, नाव काल्पनिक) प्रेमसंबंध आहे. त्यामुळे तो नेहमी नागपुरात येतो. गेल्या आठवड्यातही तो नागपुरात आला होता. गुन्हेगारी वृत्तीच्या या तरुणाची नजर अवनी ज्वेलर्सवर गेली. दुकानात खरे सोने आहे की बेन्टेक्स ते तपासण्यासाठी १ जुलैला शैलाला अवनी ज्वेलर्समध्ये नेले. तेथे त्याने रेकीच्या बहाण्याने शैलाला नथनी घेऊन दिली. मालक एकटाच दुकानात बसतो आणि दुकानात मालही मोठा असल्याचे त्याने हेरले. त्यानंतर आपल्या तीन साथीदारांना बोलवून घेत त्याने ज्वेलर्समध्ये दरोडा घातला. माहिती कळताच दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सर्वप्रथम दुकानातील सीसीटीव्हीचे आठ दिवसांपासूनचे फुटेज तपासले. दरोडेखोरांपैकी एक आरोपी पांडे १ जुलैला एका तरुणीसोबत दुकानात येऊन गेल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी १ जुलैचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी पांडे त्या तरुणीसोबत एटीएममध्ये गेल्याचे आणि तेथून त्याने ५ हजार रुपये काढल्याचेही उजेडात आले. ज्यातून रक्कम काढली त्या अकाउंटचे डिटेल्स बँक अधिकाऱ्यांकडून मिळवल्यानंतर आरोपीचे नाव, गाव, पत्ता पोलिसांच्या हाती लागला. सीसीटीव्हीने तरुणीच्या घराचा मार्गही दाखवला अन् पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व कड्या उलगडत गेल्या.
---
मी लॉजमध्ये आहे, हे बघ...।
आरोपी पांडे नागपुरातून पळून गेल्यानंतर मध्य प्रदेशातील जबलपूर कटनीच्या मध्ये असलेल्या छपरा (खवासा) येथील प्रेम लॉजमध्ये पोहोचला. तेथून त्याने प्रेयसी शैलाला रात्री ११.१५ वाजता व्हिडीओ कॉल केला. मी प्रेम लॉॅजमध्ये आहे, बघ मोठा माल हाताला लागला असे सांगून त्याने रोकड तसेच सोन्याचे दागिने स्टीलच्या डब्यात भरले. हा व्हिडीओ पोलिसांनी बघितला. आरोपी प्रेम लॉजमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला अन् नंतर चारपैकी दोन दरोडेखोर पकडले गेले.
---
तर एनकाउंटर झाले असते
आरोपींकडे दोन पिस्तूल आणि जिवंत काडतूसे होती. त्यांनी मंगळवारी पहाटे १.४५ वाजता पोलिसांना धोकादायक पद्धतीने चकमा देऊन पळून जाण्याचे प्रयत्न केले. आरोपींनी पोलिसांवर फायरिंग केली असती तर त्यांचे तेथे एन्काउंटरही झाले असते.
----