एटीएममध्ये चिल्लर नोटांचा अभाव : डिजिटल व्यवहार सुरू नागपूर : नोटाबंदीच्या ४९ दिवसानंतर बँकांवरील ताण काहीसा कमी झाला आहे, पण ग्राहकांवर वाढला आहे. अनेकांना पर्याप्त नोटा मिळत नाही तर काहींना चिल्लरची समस्या आहे. दुसरीकडे बँकांचे व्यवहार ठराविक वेळेत सुरू झाले असून कर्मचाऱ्यांना फावला वेळ मिळत आहे. बहुतांश एटीएममध्ये दोन हजाराची नोट मिळत आहे. थोड्याच एटीएममध्ये १०० आणि ५०० च्या नोटा आहेत. आठवड्यापासून एटीएममध्ये नोटा दिसत आहेत. पण अनेक एटीएमचे शटर नोटाबंदीनंतर उघडले नाही. दोन हजारापेक्षा कमी रक्कम असलेल्या खातेधारकांना चिल्लर नोटा मिळत नसल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी) बँकांमध्ये येत आहेत १०० च्या नोटा अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेकडून दोन हजाराच्या नोटा देण्यात येत आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त दोन हजाराच्या नोटा देण्यात निर्देश आहेत. बाजारात चिल्लर कमी असल्यामुळे अनेक बँकांनी चिल्लर नोटा देण्याची रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली आहे. तीन दिवसांपासून बँकांना २०, ५० आणि १०० च्या नोटा मिळत आहेत. भाजी विक्रेत्यांचे डिजिटल व्यवहार नोटाबंदीनंतर चिल्लरच्या तुटवड्याचा सर्वाधिक परिणाम लहान दुकानदार आणि विक्रेत्यांवर पडला आहे. उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्याकरिता त्यांनी डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून विक्री सुरू केली आहे. फूटपाथवर चष्मे व बेल्ट विकणारे आणि भाजी विक्रेत्यांनी डिजिटल व्यवहाराचा प्रयोग सुरू केला आहे. काही अॅप कंपन्या त्यांना नि:शुल्क अॅपवर खाते तयार करून देत आहेत.
बँकांवर कमी, ग्राहकांवर ताण जास्त
By admin | Published: December 29, 2016 2:48 AM