लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या बिकट परिस्थितीत सामान्यजनही नशिबाकडे बोट दाखवून हतबल होतात. पण काही जणांचा आत्मविश्वास इतका प्रबळ असतो, की ते नशिबाने दिलेल्या संकटावरही मात करतात. जेईई अॅडव्हान्समध्ये दिव्यांग प्रवर्गात प्रथम आलेला वेदांत बोरकुटे हा त्यातीलच एक. ध्येयपूर्तीची जिद्द, प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनतीवर विश्वास त्याच्या व्यक्तिमत्त्वातील या त्रिसूत्रीने त्याने भविष्याची प्रकाशवाट गाठली. त्याचे यश हे कौतुकास्पदच.दीपक बोरकुटे व अपर्णा बोरकुटे यांचा वेदांत हा एकुलता एक मुलगा. जन्मताच त्याच्या एका डोळ्याची ज्योती हरविली आहे. आईवडिलांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण यश आले नाही. पण आईवडिलांनी त्याच्या दिव्यांगत्वाचा बाऊ केला नाही. त्याला प्रोत्साहन दिले. त्याचा आत्मविश्वास वाढविला आणि यशस्वीरीत्या त्याला पायावर उभे राहण्याचे बळ दिले. आईवडिलांच्या आधाराने त्याच्या पंखांना बळ मिळाले आणि यशाला गवसणी घालण्यासाठी प्रचंड जिद्द निर्माण झाली. वेदांतने दहावीच्या परीक्षेत सामान्य विद्यार्थ्यांच्या तोडीचे ९८.२ टक्के गुण मिळविले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांने जेईई अॅडव्हान्सची तयारी सुरू केली. बारावीच्या परीक्षेसोबतच तो जेईईची तयारी करीत होता. अभ्यासापासून त्याने स्वत:ला दूर केले नाही. आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्याने अभ्यासाचे नियोजन आखले. त्यावर वाटचाल सुरू केली. अशात बारावीचा निकाल हाती आला. वेदांतला ९१.८५ टक्के गुण मिळाले. खरी प्रतिक्षा त्याला जेईई अॅडव्हान्सची होती. तो निकाल शुक्रवारी लागला. त्याने दिव्यांग वर्गांमध्ये ऑल इंडियामध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला. देशातील टॉपच्या आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे त्याचे स्वप्न या निकालाने पूर्ण झाले आहे. यापुढची त्याची वाटचाल आयआयटी पवई आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना वेदांत म्हणाला की, आईवडिलांची मिळालेली साथ, आयआयटी होमकडून मिळालेले मार्गदर्शन, यामुळे यशाला गवसणी घालणे सोपे गेले.लक्ष्य गाठण्यासाठी त्याग महत्त्वाचा असतो२०१७ पासून वेदांत जेईई अॅडव्हान्सची तयारी करीत आहे. सामान्यपणे या वयात मुले भरपूर अॅक्टिव्ह असतात. पण वेदांतने स्मार्ट फोनला हात लावला नाही. त्याचे फेसबुक अकाऊंट नाही. व्हाटअॅप तो कधी वापरत नाही. सोशल मीडियापासून तो दूर असतो. या सर्व गोष्टी त्याला आवडत नाही. टीव्ही सुद्धा बघितला नाही. वाचनाची आवड आणि बुद्धिबळात थोडासा तो रमतो. आजच्या तरुणाईला ज्या सोशल मीडियाने भुरळ पाडली, त्या सोशल मीडियाशी संबंधही न ठेवणारा वेदांत म्हणतो, लक्ष्य गाठण्यासाठी काहीतरी त्याग करावा लागतो.मुलावर प्रचंड विश्वास आहेवेदांतमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. आम्ही फक्त त्याचे सारथी होतो. त्याने आपले लक्ष्य गाठण्यासाठी घेतलेली मेहनत खूप महत्त्वाची आहे. आम्हाला त्याच्यावर विश्वास होता. त्याने जिद्दीने तो पूर्ण केला आहे. देवाने त्याची एक बाजू बंद केली असली, तरी दुसरी बाजू त्याने आपल्या प्रयत्नाने उघडली आहे, अशी भावना आई अपर्णा व वडील दीपक बोरकुटे यांनी व्यक्त केली.