नागपूर : देशभरात ‘लम्पी’ने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये या राेगाचा प्रादुर्भाव झाला असून, नागपूर जिल्ह्यातही ‘एन्ट्री’ झाली आहे. त्यामुळे पशुपालक चिंतित आहे. अशात पशुपालकांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी ‘लम्पी राेग पे चर्चा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. चारगाव (ता. उमरेड, जि. नागपूर) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. याअंतर्गत पशुपालकांमधील भीती दूर केली जात आहे.
सध्या सर्वत्र ‘लम्पी’वरच चर्चा केली जात असताना पशुपालकांमधील भीती, त्यांच्यातील गैरसमजुती दूर करून काळजी काय घ्यावी, उपचार कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘लम्पी राेग पे चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ चे पशुधन पर्यवेक्षक डाॅ. पवन भागवत यांनी नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच हा उपक्रम सुरू केला. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी दिवसा घरी भेटणे अशक्य असते. अशात त्यांची सायंकाळनंतर भेट घेऊन सर्व पशुपालकांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ‘लम्पी’ची लक्षणे, काय काळजी घ्यावी याबाबत सांगितले जात आहे. साेबतच ‘लम्पी’ रोगाने ग्रस्त जनावर असल्यास त्यास सर्वांपासून दूर करणे, चारा-पाणी वेगळे करणे, माेकळ्या कुरणामध्ये न साेडणे आणि पशुवैद्यकीय सल्ला या बाबींवर भर देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत चारगाव केंद्रांतर्गत निशाणघाट, मुरादपूर, सुराबर्डी व चारगाव येथील पशुपालकांशी संवाद साधण्यात आला. तसेच आजूबाजूच्या गावातही टप्प्याटप्प्याने जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकरी शेतातील कामे आटाेपून आल्यावर ‘कट्टा’सारखा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. साधारणत: ९.३० वाजेपर्यंत पशुपालकांना ‘लम्पी राेग पे चर्चा’ अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
‘लम्पी’ला घाबरण्याचे कारण नाही. याेग्य खबरदारी आणि उपचार हे त्यासाठी आवश्यक आहे. साेबतच काेणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. ‘लम्पी राेग पे चर्चा’ या उपक्रमांतर्गत पशुपालकांशी संवाद साधण्यात येत असून, त्यांच्यातील गैरसमज दूर केले जात आहेत.
- डाॅ. पवन भागवत, पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२, चारगाव, ता. उमरेड, जि. नागपूर