नागपूर : नुकतेच २५ ऑक्टाेबरला आपण खंडग्रास सूर्यग्रहण पाहिल्यानंतर आता चंद्रग्रहण अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. येत्या ८ नाेव्हेंबरला सायंकाळी चंद्र ग्रहणाच्या स्थितीतच उगविणार आहे. त्यावेळी चंद्राची सावली सूर्यावर पडली हाेती, यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण हाेईल. विशेष म्हणजे, देशात अरुणाचल प्रदेशात चंद्र उगवतीला ते खग्रास स्थितीत दिसेल, पण उर्वरित भारतात ते खंडग्रास स्थितीतच बघायला मिळणार आहे.
८ नाेव्हेंबर राेजी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत असतील, पण पृथ्वी या दाेन्हींच्या मध्ये आली असेल. अवकाशात चंद्रग्रहणाला दुपारपासूनच सुरुवात हाेईल. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३२ वा छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. २.३९ वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल, ३.४६ वाजता खग्रास ग्रहण सुरू होऊन ५.११ वाजता संपेल. उत्तर-दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलियात ग्रहण खग्रास स्थितीत दिसेल, पण भारतातून खंडग्रास दिसेल.
पूर्वाेत्तर भारतात अरुणाचल प्रदेशातून सायंकाळी ४.२३ वाजता ग्रहणातच चंद्र उगवणार असल्याने ताे खग्रास दिसेल. पूर्वाेत्तर भागात ग्रहण ९८ टक्के आणि ३ तास दिसेल. त्यानंतर, ते खंडग्रास हाेण्यास सुरुवात हाेईल. महाराष्ट्रात गडचिराेली येथून सायंकाळी ५.२९ वाजता सर्वात आधी ग्रहण दिसेल. नागपूरला ते ५.३२ वाजता दिसेल, तर मुंबईत सायंकाळी ६.०१ वाजता चंद्रोदयातच ग्रहण सुरू हाेईल. देशभरात सायंकाळी ७.२६ वाजता चंद्रग्रहण समाप्त हाेईल, अशी माहिती रमन विज्ञान केंद्राद्वारे मिळाली आहे.
भारतात कुठून, कधी, किती वेळ?
- अरुणाचल प्रदेशात दुपारी ४.२३ वाजता ग्रहणातच चंद्राेदय हाेईल, म्हणून ते खग्रास दिसेल. सर्वाधिक काळ म्हणजे ३ तास दिसेल.
- काेलकाता येथून ४.५२ वाजता, पाटणा येथून ५ वाजता, लखनऊ ५.१५ वाजता, तर दिल्लीत ५.३१ वाजता सुरुवात.
- गुजरातच्या भूजमधून सर्वात उशिरा ६.१० वाजता ते सुरू हाेईल व १ तास १८ मिनिटे सर्वात कमी वेळ दिसेल.
महाराष्ट्रात कुठे, कधी?
- ग्रहणातच उदय हाेणार असल्याने क्षितिजावर चंद्र आल्यानंतरच ग्रहण दिसेल.
- गडचिराेलीत सायंकाळी ५.२९ वाजता सुरू हाेईल व सर्वाधिक १ तास ५६ मिनिटे दिसेल.
- चंद्रपूर येथे ५.३३ वाजता, नागपूर ५.३२ वाजता, यवतमाळ ५.३७ वा., अकोला ५.४१ वा, जळगाव ५.४६ वा., औरंगाबाद येथे ५.५० वा, नाशिक ५.५५ वा., पुणे ५.५७ वाजता व मुंबईत ६.०१ वाजता ग्रहण सुरू होऊन ७.२६ वाजता संपेल.
पृथ्वीवरची दररोजची रात्र हाही एक सावलीचाच प्रकार असून, अशी ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात. ग्रहणे हा केवळ ऊन-सावल्यांचा खेळ असून, अंधश्रद्धा मानणे चुकीचे आणि अवैज्ञानिक आहे. सर्व नागरिक, विद्यार्थ्यांनी ग्रहणांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करावा. चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही. पूर्व दिशेला क्षितिज दिसेल, अशा मैदानांत किंवा घराच्या सुरक्षित छतावर जाऊन साध्या डोळ्याने किंवा लहान द्वीनेत्री/बायनोकुलरने ग्रहण पाहावे, असे आवाहन रमन विज्ञान केंद्राने केले आहे.