लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मोठा मोबदला देण्याचे आमिष दाखवून कमी भावात सोने खरेदी विक्रीच्या धंद्यात रक्कम गुंतवायला लावून दोन भामट्यांनी एकाची फसवणूक केली. मोहम्मद शाहरुख अन्सारी (वय २६) आणि मुजिब खान (वय ५०, दोघेही रा. इतवारी मालधक्का) अशी आरोपींची नावे आहेत. तर, फसवणूक झालेल्याचे नाव समीर अहमद वसिम अहमद आहे. ते रामकुलर चाैकाजवळ राहतात.
दोन वर्षांपूर्वी आरोपींनी समीरला आम्ही मुंबईहून कमी किंमतीत सोने आणून नागपुरात विकतो, अशी थाप मारली. या धंद्यात मोठा लाभ मिळतो, असे सांगून समीरला रक्कम गुंतवण्यास बाध्य केले. त्यानुसार, समीरने १६ फेब्रुवारी २०१९ ला आरोपी शाहरुख आणि मुजिब खानला ८ लाख, ५० हजार रुपये दिले. दोन वर्षे झाल्यानंतर आरोपींनी समीरला आतापावेतो एकही रुपया लाभ दिला नाही. मूळ रक्कमही परत केली नाही. आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे समीरने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी सुरू आहे.
----