लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यूएस मध्ये गुडविल अॅम्बेसडर बनविण्याचे स्वप्न दाखवून एका डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी सव्वादोन लाखांचा गंडा घातला. सोनेगाव पोलीस ठाण्यात आलेल्या या प्रकरणामुळे पोलीसही चक्रावले आहेत.सोमलवाड्यात राहणारे प्रशांत सीतारामजी चंदनखेडे (वय ४०) डॉक्टर आहेत. त्यांनी २०१७ मध्ये संयुक्त राष्ट संघाच्या कथित संकेतस्थळावर नोकरी संबंधाने मेसेज पाठविला होता. त्यांना तिकडून बायोडाटा मागितला गेला.त्यानंतर कथित अधिकाऱ्याने चंदनखेडे यांना यूएसएचे गुडविल अॅम्बेसडर म्हणून नियुक्त करण्याची थाप मारली. त्यासाठी मिनिटेरियन प्रोजेक्टला तीन हजार बिलियन डॉलर देण्याचीही बतावणी केली. मात्र, हे डॉलर घेण्यापूर्वी ७५० यूएस डॉलर जमा करावे लागेल, असे सांगितले. चंदनखेडे यांनी अमेरिकेतील अकासिया प्लेस, मिसोरी, टेक्सास शहरातील बँक ऑफ अमेरिकामध्ये रक्कम जमा करायला सांगितल्याने चंदनखेडे यांना विश्वास वाटला होता. त्यामुळे त्यांनी या बँकेत नंतर चित्तोडगड (राजस्थान) आणि आयसीआयसीआयच्या कोलकाता (पश्चिम बंगाल) बँकेत रक्कम जमा करायला लावली. २० नोव्हेंबर २०१७ ते २ फेब्रुवारी २०१९ पर्यंत एकूण २ लाख, २० हजार रुपये जमा केल्यानंतरही वेगवेगळी कारणे सांगून रक्कम जमा करण्यास सांगितले जात असल्याने चंदनखेडे यांना संशय आला. त्यांनी रक्कम जमा करण्यास नकार देताच आरोपीने चंदनखेडेंसोबत संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने चंदनखेडे यांनी सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकरण तपासासाठी सायबर शाखेकडे सोपविण्यात आले आहे.सारेच चक्रावून टाकणारेआरोपींनी ज्या पद्धतीने अमेरिकन बँक, राजस्थान, पश्चिम बंगालमधील बँकेत खाते उघडले. संयुक्त राष्ट्रसंघाचे संकेतस्थळ / बनावट आयडी तयार केली आणि चंदनखेडे यांना फसविले, तो सर्वच प्रकार चक्रावून सोडणारा आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धतीने फसवणूक करीत असल्याने सर्वसामान्यच नव्हे तर आता पोलिसांनाही तोंडात बोट घालायला भाग पाडत आहे.
यूएसए मध्ये गुडविल अॅम्बेसडर बनविण्याची थाप : डॉक्टरला घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:00 AM
यूएस मध्ये गुडविल अॅम्बेसडर बनविण्याचे स्वप्न दाखवून एका डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी सव्वादोन लाखांचा गंडा घातला.
ठळक मुद्देसव्वादोन लाख लंपास