नागपूर : आयुध निर्माणीत नोकरी लाऊन देण्याचे आमीष दाखवून ११ युवकांची ४३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी धरमपेठेतील बाबा ताज इमारतीतील सौंदर्या इन्स्टिट्यूट अॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या संचालकासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
राजीव हिरास्वामी रेड्डी (४७, रा. अमन-गोल्डन पॅलेस, निखारे ले-आउट, मानकापूर), सुरज राजकुमार घोरपडे (३५), सोनाली सुरज घोरपडे (३३) दोघे रा. बुद्धनगर, कवठा देवळी जि. वर्धा, मिर्झा वसीम बेग रशीद बेग (४०, रा. गुलशननगर, यवतमाळ) आणि शेलेश बाबाराव कोल्हे (४५, महालक्ष्मीनगर मानेवाडा रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पिंकेश विठ्ठल बोरकर (३२ रा. नाईकनगर,अजनी) हा अहमदाबादमधील कोरोना रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी आहे. २०१८ मध्ये पिंकेश व त्याची पत्नी नाईकनगर येथे किरायाने राहायला आली. दोन महिन्यानंतर आरोपी सूरज हा पत्नी सोनालीसह तिथेच किरायाने राहायला आला. पिंकेश व सूरजमध्ये मेत्री झाली.
ऑक्टोबर २०१० मध्ये सूरजने त्याला आयुध निमार्णीत नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र पिंकेशला दाखवून त्याचा विश्वास संपादन केला. मी तुलाही नोकरी लावून देतो, असे सूरजने पिंकेशला सांगितले. नोव्हेंबर महिन्यात सूरज त्याला घेऊन धरमपेठेतील व्हीआयपी मार्गावरील बाबा ताज इमारतीतील सौंदर्या इन्सिट्युट अॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या कार्यालयात गेला. तेथे रेड्डी याच्यासोबत ओळख करून दिली. माझे वडील हिरास्वामी रेड्डी हे आयुध निर्माणीत बड्या पदावर आहेत, असे रेड्डीने पिंकेशला सांगून त्यासाठी ४ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. आरोपी सुरजने त्याची हमी घेतली. ३१ डिसेंबरला पिंकेशने सूरजसोबत जाऊन रेड्डीला एक लाख रुपयांचा चेक, आधारकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड व दोन फोटो दिले. रेड्डीने पिंकेशची एका फॉर्मवर स्वाक्षरी घेतली. पिंकेशने वेळोवेळी रेड्डीला सूरज व बेगच्या मार्फत पूर्ण पैसे दिले. मात्र पिंकेशला नोकरी मिळाली नाही. पिंकेश याच्याप्रमाणेच रेड्डी व त्याच्या टोळीने आशिष बन्नागरे, नितीन तमगिरे, अतुल वानखेडे, मंगला वानखेडे, प्रशांत बिरे, स्वप्निल राघोर्ते, पवन मानकर, बालिशकुमार डबरासे, अभिषेक रामगिरीकर, निखिलेश रेड्डी यांचीही एकूण ४३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केली.
पत्नीचे दागिने विकून दिले पैसेपिंकेशने सुरुवातीला एक लाख रुपये रेड्डीला दिले. परंतु उरलेल्या तीन लाखांची जुळवाजुळव करणे त्याला कठीण झाले. परंतु आरोपी सुरज व त्याची पत्नी सोनालीने पिंकेशला पत्नीचे दागीने विकण्याचा सल्ला दिला. पिंकेशने पत्नीचे दागीने विकले तसेच भावाजवळून ४० हजार रुपये घेऊन रेड्डीला संपूर्ण रक्कम दिली.
वसीमने घेतली परीक्षा, वैद्यकीय तपासणीही करवून घेतली रेड्डी व त्याच्या टोळीने कार्यालयातच जून २०१९ मध्ये आयुध निर्माणीतील चार्जमन पदाची परीक्षा घेतली. त्यानंतर बेग याने रेन्बो हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी करवून घेतली. पिंकेशला नियुक्तीपत्र दिले, त्यावर स्वाक्षरी घेऊन ते परत घेत नियुक्तीपत्र पोस्टाने येईल, असे सांगितले. परंतु नियुक्तीपत्र न मिळाल्याने अखेर पिंकेशने सीताबर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला.