नागपूर : शेअर खरेदी-विक्रीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे आमीष दाखवून बँकेत लिपीक असलेल्या महिलेजवळ असलेली २५ लाखांची जमापूंजी सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन हडपली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३४ वर्षीय पीडित महिला जरीपटका पोलीस ठाण्याहद्दीत राहते. ती राष्ट्रीयकृत बँकेत लिपीक या पदावर आहे. ६ नोव्हेंबर २०२३ ला ती घरी असताना लिंक मोर या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमीन जेसीकाने पीडित महिला लिपिकास शेअर ट्रेडिंग लर्निग वेबसाईटची जाहिरात पाठविली. पीडित महिलेनी संपर्क साधला असता त्यांना शेअर खरेदी विक्रीत भरघोस लाभ मिळत असल्याचे आमिष दाखविले. पीडिता त्यांच्या जाळ्यात अडकली. आरोपीने त्यांना एका व्हॉट्सअप गुपवर अॅड केले. ग्रूपमध्ये शेअर खरेदी विक्री करणारे बरेच लोक होते. काही लोक लाखांत लाभ मिळाल्याचे स्क्रीनशॉट टाकत होते. त्यामुळे पीडितेचा आणखी विश्वास बसला.
पीडित महिलेने शेअर खरेदीचा सपाटा लावला. त्यांना ऑनलाईन फायदा होत असल्याचे दिसले. त्यामुळे महिलेने गुंतवणुकीची रक्कम वाढविली. परंतु झालेला नफा काढण्याची प्रक्रीया केली असता आणखी गुंतवणूक करा, असा मेसेज येत होता. ७ डिसेंबरपर्यत त्यांनी २४ लाख ४८ हजार रुपये गुंतविल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विजयकुमार औटी यांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सायबर गुन्हेगाराविरुद्ध कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), सहकलम ६६ (ड) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.