योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: वर्षाला ७२० टक्क्यांच्या ‘प्रॉफिट’चे आमिष दाखवत नाशिक-बुलडाण्याच्या टोळीने फसवणुकीचे रॅकेट रचले व नागपुरातील दोन तरुणांना जाळ्यात ओढले. क्रिप्टो करंसीत गुंतवणूकीच्या नावाखाली त्यांनी आरोपींना ७.४३ लाखांचा गंडा घातला. या टोळीने नागपुरातील इतरही लोकांना असे फसवले असल्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
उमेश गणपतराव कडू (२९,वसंतनगर, जुना बाबुळखेडा) व राहुल चिलकुलवार असे फसवणूक झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना राजेंद्र उपाध्याय (नाशिक) व गोपालसिंह तोमर (खामगाव, बुलडाणा) यांनी संपर्क केला व त्यांची प्लॅटीन वर्ल्ड नावाची कंपनी असल्याची बतावणी केली. आमची कंपनी क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक करते व त्यातून खूप फायदा होतो. जर आमच्या कंपनीत तुम्ही गुंतवणूक केली तर दिवसाला २ टक्के, महिन्याला ६० टक्के व वर्षाला ७२० टक्के नफा मिळेल, असा दावा त्यांनी केला. त्यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व वर्धा मार्गावरील हॉटेल सेंटर पॉईंट येथे उमेशची भेट घेतली.
उमेशला त्यांच्यावर विश्वास घेतला व त्याने राहुलसोबत ७.४३ लाखांची रक्कम गुंतवली. मात्र आरोपींनी त्यांना कुठलाही परतावा दिला नाही. उमेशने त्यांना रक्कम परत मागितली असता आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर उमेशने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली व पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.