नागपूर : अर्ध्या किंमतीत किराणा तसेच इलेक्ट्रीकचे सामान मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका दाम्पत्याने वस्तीतील नागरिकांना सव्वा लाखाहून अधिकचा गंडा घातला. फसवणूक झालेल्या लोकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुनंदा माधवराव खंते (५०, साईबाबा नगर, कुरकुडे लॉनजवळ) यांच्या घरी नवीन धनाजी पांचाळ व विद्या पांचाळ हे दांपत्य भाड्याने रहायला आले होते. त्यांनी वस्तीतील लोकांशी गोड बोलून चांगले संबंध प्रस्थापित केले व काही डीलर्स अगदी जवळच्या ओळखीचे असल्याची बतावणी केली. आपल्याला थेट अर्ध्या किंमतीमध्ये किराणा सामान तसेच इलेक्ट्रीकच्या वस्तू मिळतील, असा दावा केला. त्यांनी वस्तीतील काही लोकांना विश्वासात घेतले.
घरमालक सुनंदा खंते यांनीदेखील त्यांच्यावर विश्वास टाकला. पांचाळ दाम्पत्याने त्यांच्यासह तीन जणांकडून ६ ते १२ एप्रिल या कालावधीत १ लाख ३८ हजार रुपये घेतले. मात्र एकाही व्यक्तीला सामान दिले नाही. विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. त्यानंतर ते कुणालाही न सांगता घर सोडून पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खंते यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी पांचाळ दांपत्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदविला असून त्यांचा शोध सुरू आहे.