लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हप्ता वसुलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कुख्यात रोशन शेख याने ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून लक्षावधीची माया जमविल्याची माहिती आहे. या पैशातून तो ऐषोआरामाचे आयुष्य जगायचा. त्याच्या बँकेतील खात्याची तपासणी केल्यावरच यातील सत्यता पुढे येऊ शकणार आहे. क्राईम ब्रँचने अपहरण आणि हप्ता वसुलीच्या प्रकरणात रोशनला अटक केली असून तो १६ मे पर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनला हप्तावसुलीच्या आरोपाखाली पकडले असले तरी त्याचे खरे काम शोषणाची क्लिपिंग तयार करून ब्लॅकमेलिंग करणे हे होते. नागपुरातील लोकांसोबतच मुंबई-पुणे येथील लोकही त्याचे शिकार ठरले आहेत. तो रक्कम घेऊन पीडितांना आपल्याकडे बोलवायचा. त्यानंतरही शोषण करायचा. बरेचदा तर तो रकमेसाठी पीडितांच्या घरीही पोहचत असे. कुटुंबीयांना क्लिपिंग दाखविण्याची धमकी देऊन रकमा उकळायचा. यामुळेच अनेक पीडित त्याच्यापुढे यायला घाबरायचे. त्याच्या धमक्यांना घाबरून ऑनलाईन पेमेंट करायचे. रोशनच्या बँक खात्याची तपासणी केल्यावर या संदर्भातील अधिक धागेदोरे पोलिसांच्या हातात येऊ शकतात. रोशन नियमितपणे मुंबई आणि पुणे विमान प्रवास करायचा. रोजगाराचे कोणतेही साधन नसतानाही त्याचा वारंवार होणारा विमान प्रवास अद्यापर्यंत चर्चेतच आला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपले सावज शोधण्यासोबतच तो हुक्का पार्लरशी संबंधित असलेल्या नशेच्या व्यवहारासाठीही वारंवार मुंबईला जात असे. तिथून तो मादक पदार्थाची आयात करीत असे, अशी माहिती आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरमधील हुक्का पार्लरसोबतच काटोल मार्गावर त्याचा दुसरा अड्डा आहे. तिथे एका सरकारी क्वॉर्टरमधून तो हा व्यवसाय चालवितो. या ठिकाणीदेखील पीडितांचे शोषण केले जायचे. या ठिकाणी तो शस्त्रेही लपवून ठेवायचा. आपल्या कारच्या खालील भागातही तो शस्त्र लपवून ठेवत असे. या प्रकरणात क्राईम ब्रँचने त्याला अटक केली असली तरी त्यांच्या ढिलाईमुळे अद्याप अन्य आरोपींना पकडण्यात आलेले नाही.शहर पोलिसातही रोशन गँगचे काही समर्थक असल्याची माहिती असून ते प्रकरण निस्तरण्याच्या कामी लागले आहेत. त्यांच्यामुळेच तो कारवाईपासून आतार्यंत वाचत आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी हाती घेतलेल्या ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ अंतर्गत हा प्रकार उजेडात आला आहे. यामुळेच क्राईम बॅ्रंच पाळेमुळे शोधण्याच्या कामी लागली आहे.
ब्लॅकमेलिंगच्या कमाईवर चैन : नागपुरातील कुख्यात रोशन शेखचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 11:46 PM