लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ना विम्याचे कवच, ना सुरक्षेची हमी. तरीही मनमानी रक्कम उकळून प्रवाशांची लुट करणाऱ्या खासगी बस (ट्रॅव्हल्स)वाल्यांना उत्तर देण्याची तयारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने चालविली आहे. प्रवाशांना सुरक्षेचे कवच देतानाच आरामदायक प्रवासाची हमी तसेच लक्झरीचा फिल देण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे. होय, एसटीच्या राज्यभरातील ताफ्यात आकर्षक अशा स्लिपर कोच दाखल झाल्या आहेत. नागपूरच्या गणेशपेठ आगारातही सहा 'लक्झरी शयनयान' शुक्रवारी रात्रीपर्यंत पोहचणार असून, सोमवारपासून त्या प्रवाशाच्या सेवेत दाखल होणार आहेत.
नागपूर - पुणे मार्गावर खासगी बसला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. जवळपास सर्वच ट्रॅव्हल्समध्ये रोज प्रवासी गर्दी करत असल्याने ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने रक्कम वसुलतात. दसरा - दिवाळी सारख्या सणामध्ये तर ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांची अक्षरश: लूट करतात. नागपूर - पुणे मार्गावर चक्क विमान प्रवासाएवढे भाडे उकळतात. हा सर्व प्रकार घेऊन एसटीने या ३० सिटर स्लिपर कोच प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत.नागपूर -पुणे मार्गावर रोज सेवागणेशपेठ आगार प्रमूख गाैतम शेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना लक्झरीचा फिल देणाऱ्या या सहा नव्या कोऱ्या बसेस नागपूर - पुणे मार्गावर चालविल्या जातील. सोमवारपासून त्या प्रवाशांना सेेवा देतील. गणेशपेठ आगाराला एसटी महामंडळाने रोज तीन फेऱ्यांसाठी दुपारी ३, सायंकाळी ५ आणि ६ वाजता या गाड्या चालविण्याची मंजूरी दिली आहे. मात्र, सुरुवातीला काही दिवस रोज दोनच फेऱ्या चालविण्यात येतील. प्रवाशांची मागणी आणि प्रतिसाद लक्षात घेऊन तिसरी फेरी सुरू केली जाईल.
ट्रॅव्हल्स पेक्षा कमी तिकिट
या गाडीची तिकिट ट्रॅव्हल्सपेक्षा कमी असेल. नियमित साधारणत: ट्रॅव्हल्सवाले १८०० आणि प्रवाशांची गर्दी पाहून मनात येईल, तेवढे प्रवास भाडे घेतात. एसटी महामंडळाने मात्र नागपूर ते पुणे प्रवास भाडे १६०० रुपये ठेवले आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत थेट औरंगाबाद किंवा पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट टळणार आहे.नागपूर - पुणे दरम्यान १४ स्टॉपेजया बसमध्ये प्रवाशांना आरामदायी प्रवासाची अनुभूती येईल. शिवाय खासगीच्या तुलनेत ते सुरक्षित प्रवास करू शकतील. कारण एसटीच्या नियमानुसार बसचालक स्टेअरिंग हातात घेण्यापूर्वीच त्याची तपासणी होणार आहे. नागपूर ते पुणे दरम्यान कोंढाळी, तळेगाव, कारंजा, अमरावती, चिखली, औरंगाबादसह एकूण १४ थांबे राहणार आहेत.