नागपूर : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात नोंदविण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आज, शुक्रवारी निर्णय जाहीर करणार आहे.
काही दिवसांपूर्वी या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप आहे. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलिसांनी रेड्डी यांच्यासह इतरांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.