नागपूर : पांजरा येथील माँ जगदंबा प्लॉट खरेदी-विक्री केंद्राचे राजेश चिंचुलकर यांना अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची चपराक बसली. वानाडोंगरीतील तक्रारकर्ते ग्राहक पुरुषोत्तम पडोळे यांचे ६० हजार २०० रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश आयोगाने चिंचुलकर यांना दिला. तसेच, पडोळे यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम चिंचुलकर यांनीच द्यायची आहे.
व्याज ४ जानेवारी २००७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी चिंचुलकर यांना ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. पडोळे यांच्या तक्रारीवर आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. तक्रारीनुसार, पडोळे यांनी चिंचुलकर यांच्याकडून मौजा गुजरखेडी येथील पाच भूखंड १ लाख ६४ हजार ४१५ रुपयात खरेदी करण्यासाठी करार केले व चिंचुलकर यांना तीन विविध तारखांना एकूण ६० हजार २०० रुपये अदा केले. चिंचुलकर ३१ जानेवारी २००७ पर्यंत भूखंडांचे विक्रीपत्र करून देणार होते. ती मुदत संपल्यानंतर पडोळे यांनी विक्रीपत्र करण्याची व भूखंडांचा ताबा देण्याची मागणी केली. परंतु, चिंचुलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. परिणामी, पडोळे यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. त्यात चिंचुलकर यांनी लेखी उत्तर दाखल करून तक्रारीतील सर्व आरोप अमान्य केले व तक्रार खारीज करण्याची आयोगाला विनंती केली. शेवटी आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता सदर निर्णय दिला.
--------------
भूखंडांपासून वंचित ठेवले
चिंचुलकर हे पडोळे यांच्याकडून स्वीकारलेली रक्कम १९९९ पासून वापरत आहेत. याशिवाय त्यांनी पडोळे यांना भूखंडांच्या उपभोगापासून वंचित ठेवले आहे. चिंचुलकर यांच्या अशा वागण्यामुळे पडोळे यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला तसेच आयोगात तक्रार दाखल करावी लागली. चिंचुलकर यांनी पडोळे यांच्यासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला व सेवेत त्रुटी ठेवली, असे मत आयोगाने निर्णयात नोंदवले.