काेंढाळी : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. ते राेखण्यासाठी राज्य शासनाने धारा १४४ अन्वये जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे. या विपरीत परिस्थितीमध्ये दंगल अथवा दंगलसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिसांनी काेंढाळी येथील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वर्धा राेड टी-पाॅईंट येथे शुक्रवारी (दि.२३) दुपारी १ वाजता माॅकड्रील केले.
पाेलिसांनी राज्यात धारा १४४ अन्वये जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात तसेच आगामी सण व उत्सवाच्या काळात काेणती काळजी घ्यावी, याबाबत नागरिकांना ध्वनिक्षेपणावरून माहिती दिली. त्यानंतर दंगल हाताळण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जमाव कायदा व सुव्यवस्थेचा अचानक भंग करीत असेल तर अशा परिस्थितीत जमाव परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सूचना देणे, जमाव जुमानला नाही तर गॅस गनचा वापर करणे, सीएन सेल व टियर म्युनेशनचा वापर करणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची यावेळी रंगीत तालीम करण्यात आली. या माॅकड्रीलमध्ये ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक प्रभू ठाकरे, उपनिरीक्षक राम ढगे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले हाेते.