दीपक नारे
नागपूर : तरुणांना शेतीत फारसा रस नसला तरी चारगाव (ता. सावनेर) येथील एका तरुणाने त्याच्या शेतात माेसंबी व पपईची बाग तयार केली. बागेच्या संगाेपनासाठी कर्जबाजारी हाेऊन त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कष्ट उपसले. त्या बागेपासून आर्थिक उत्पन्न येण्यास आणखी काही वर्षे असतानाच एका माथेफिरूने बागेतील माेसंबीची ५७ आणि पपईची तीन अशी एकूण ६० झाडे कुऱ्हाडीने ताेडली. ही झाडे ताेडल्याने त्या माथेफिरूला असुरी आनंद मिळाला असला तरी शेतकऱ्यावर मात्र आर्थिक संकट काेसळले आहे. दुसरीकडे, माथेफिरूला पाठीशी घालत खापा (ता. सावनेर) पाेलीस त्याला अटक करण्यास दिरंगाई करत आहेत.
नीतेश नागोराव लोणारे (रा. चारगाव, ता. सावनेर) या तरुण शेतकऱ्यांची सावनेर तालुक्यातील बडेगाव-सिंदेवाणी मार्गालगत सात एकर वडिलाेपार्जित शेती आहे. नीतेशला शेती व शेतीत विविध प्रयाेग करण्याची आवड असल्याने त्याने कृषी सहायक कृष्णा धोटे यांच्या मार्गदर्शनात वर्षभरापूर्वी अडीच एकरांत माेसंबी व काही जागेवर पपईच्या झाडांची लागवड करत बाग तयार केली. माेसंबीला फलधारणा हाेण्यास व त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळण्यास आणखी चार वर्षांचा वेळ हाेता.
माेसंबी आणि पपईची बाग जगवण्यासाठी नीतेश व त्याच्या घरातील प्रत्येक सदस्याने कष्ट उपसले. कर्जबाजारी हाेत या झाडांच्या संगाेपनावर नियाेजनबद्ध खर्चही केला. मात्र, बुधवारी (दि. ६) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एका माथेफिरूने त्याच्या बागेतील माेसंबीची ५७ आणि पपईची तीन अशी एकूण ६० झाडे कुऱ्हाडीने ताेडली. माथेफिरूने ताेडलेली झाडे स्वत:साेबत न नेता शेतातच टाकून दिली. यावरून ही झाडे ताेडण्यामागे त्या माथेफिरूच्या मनातील आकस स्पष्ट हाेताे.
...