स्वमर्जीने शरीर संबंध ठेवल्यानंतर बलात्काराची तक्रार करणे कायद्याचा दुरुपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:54 PM2017-11-27T12:54:36+5:302017-11-27T13:12:18+5:30
स्वमर्जीने शरीर संबंध ठेवल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार नोंदविणे म्हणजे, कायद्याचा दुरुपयोग करणे होय, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपीविरुद्धचा एफआयआर रद्द केला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : स्वमर्जीने शरीर संबंध ठेवल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार नोंदविणे म्हणजे, कायद्याचा दुरुपयोग करणे होय, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपीविरुद्धचा एफआयआर रद्द केला आहे.
न्यायमूर्ती रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला आहे. प्रकरणातील आरोपीचे नाव धीरज खाटिक असून तो भंडारा येथील रहिवासी व व्यवसायाचे शिक्षक आहे. आरोपी व तक्रारकर्ती कविता (बदललेले नाव) यांची २००७ मध्ये ओळख झाली. त्यांच्यात लवकरच चांगली मैत्री झाली व त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ते रोज फोनवर बोलत होते व नियमित एकमेकांना भेटत होते. पोलीस तक्रारीनुसार, कविताकडे आरोपी नेहमीच शरीर संबंधाची मागणी करीत होता. कविता त्याला प्रत्येकवेळी नकार देत होती. परंतु, एक दिवस त्याने लग्न करण्याचे वचन देऊन कविताला शरीर संबंधासाठी राजी केले. आरोपीने मित्राच्या खोलीमध्ये कवितासोबत दोनदा शरीर संबंध ठेवले. दरम्यान, आरोपीने दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा केला. परिणामी, कविताने २२ डिसेंबर २०१६ रोजी आरोपीविरुद्ध बलात्काराचा एफआयआर नोंदवला.
आरोपीने एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सदर निरीक्षण नोंदवून आरोपीचा अर्ज मंजूर केला. आरोपी व कविताचे १० वर्षांपर्यंत प्रेम संबंध होते. त्या काळात तिने तक्रार नोंदवली नाही. आरोपी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करीत असल्याचे कळल्यानंतर ती पोलिसांकडे गेली. तक्रारीवरून तिने सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचे स्पष्ट होते. शरीर संबंध ठेवले त्यावेळी ती सज्ञान होती. त्यामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत नाही असेही न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.