नागपूर : ‘जागतिक डॉक्टर्स डे’च्या दिवशी डॉक्टरांचा सन्मान केला जात असताना त्याच दिवशी एका वरिष्ठ आर्थाेपेडिक डॉक्टरने काळिमा फासण्याचे कृत्य केल्याने खळबळ उडाली. राज्य कामगार विमा रुग्णालयतील एका महिला डॉक्टरच्या फोटोशी रुग्णालयातीलच वरिष्ठ आर्थोपेडिक पुरुष डॉक्टरने छेडछाड करून तो फोटो व्हॉटसअॅप ग्रुपवर व्हायरल केला. याची लेखी तक्रार होताच रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित डॉक्टरला सेवेतून बरखास्त केले.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठ येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात सोयींच्या अभावाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. रिक्त जागा व कंत्राटी डॉक्टरांमुळे कामगार रुग्णांना मेडिकलमध्ये ‘रेफर’ करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यात अशा विकृत घटनेने रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे मनोबल खचून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जागतिक ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने रुग्णालयात डॉक्टरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व महिला डॉक्टरांनी हिरव्या साडीत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्या हस्ते सर्व डॉक्टरांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी त्या कंत्राटी आर्थाेपेडिक डॉक्टरने आपल्या मोबाईलने फोटो काढले. त्यातील एका महिला डॉक्टरच्या फोटोवर लज्जा उत्पन्न होईल अशी संगणकाच्या मदतीने छेडछाड केली. तो फोटो कामगार रुग्णालयातील डॉक्टरांच्या ग्रुपवरही टाकला. फोटो पाहून संबंधित महिला घाबरली. दुसऱ्याच दिवशी या किळसवाण्या प्रकाराची लेखी तक्रार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्याकडे केली. डॉ. देशमुख यांनी महिला डॉक्टरांची समिती नेमून त्यांना नोकरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
-पोलिसांत कोण करणार तक्रार!
संबंधित डॉक्टराच्या विरोधात अद्यापही पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. ज्या डॉक्टर महिलेसोबत हा प्रकार झाला त्या घाबरलेल्या आहेत. दुसरीकडे बदली करून देतील ही भीती त्यांना आहे. हा प्रकार रुग्णालयात झाल्याने व इतरही महिलांच्या फोटोसोबत असा प्रकार झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी होण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने स्वत:हून पोलिसात तक्रार करावी, अशी चर्चा महिला डॉक्टरांमध्ये आहे.
-त्या डॉक्टरची सेवा समाप्त केली
झालेला प्रकार गंभीर आहे. तक्रार प्राप्त होताच महिला डॉक्टरांची समिती नेमून संबंधित डॉक्टरची सेवा समाप्त केली. ते एक वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर आर्थाेपेडिक विभागात कार्यरत होते.
-डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय