लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला गर्भवती करणाऱ्या एका आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. बंटी ऊर्फ रवींद्र विजय धोटे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो हजारीपहाड भागात राहतो.पीडित मुलगी २० वर्षांची आहे. ती बीए प्रथम वर्षाला शिकते. ती जात असलेल्या शिकवणी वर्गासमोर आरोपी उभा राहत होता. त्यातून त्यांची ओळख झाली. २६ जानेवारीला आरोपी तिच्या घरी पोहचला. त्याने तिला प्रपोज केले. त्यानंतर लग्नाच्या आणाभाका घेत त्याने १५ फेब्रुवारी ते ७ जून या कालावधीत वारंवार शरीरसंबंध जोडले. परिणामी तरुणी गर्भवती झाली. दिवस गेल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने बंटीला कल्पना देऊन लग्नाची गळ घातली. मात्र, आरोपीने तिला औषध देऊन गर्भपात करण्याचा सल्ला दिला. त्याच्या घरच्यांनीही तिला स्वीकारण्यास तर बंटीने लग्नास नकार दिला. दरम्यान, तरुणीच्या घरच्यांना हा प्रकार माहीत पडल्यानंतर त्यांनीही आरोपी बंटीच्या बºयाच विनवण्या केल्या. फक्त कोर्ट मॅरेज करा, मुलगी आम्ही आमच्याच घरी ठेवतो. चांगला रोजगार मिळाल्यानंतर तुम्ही लग्न करा आणि तिला घेऊन जा, असे सांगूनही आरोपीची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, तो मानला नाही. त्यामुळे तरुणीने गिट्टीखदान ठाण्यात धाव घेतली. महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही.आर. राठोड यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांना परिणामांची कल्पना दिली. गुन्हा दाखल झाल्यास दोघांनाही त्रास होईल, असेही लक्षात आणून दिले. त्याचे समुपदेशन करण्याचाही प्रयत्न केला नाही. मात्र, आरोपीने तरुणीवर मातृत्व लादून तिला वाºयावर सोडण्याचे प्रयत्न केल्याने अखेर तरुणीने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. उपनिरीक्षक राठोड यांनी गुन्हा दाखल करून शुक्रवारी आरोपीला अटक केली.... म्हणून तिचा जीव वाचला!आरोपीने लग्नास नकार देऊन तिला झिडकारल्यामुळे तरुणीची मानसिक स्थिती बिघडली. तिने आत्महत्येचा विचार करून तलावाकडे धाव घेतली. तिची हालचाल पाहून तलावाशेजारी असलेल्या एका महिलेने पोलिसांना कळविले. अंबाझरी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे तिचा जीव वाचला. दरम्यान, तरुणीची समजूत घालून तिला आत्महत्या कारण्याचा विचार का केला असे विचारण्यात आले. तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. प्रकरण गिट्टीखदान ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे पोलिसांनी तिला गिट्टीखदान ठाण्यात पोहचवले. त्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.विशेष म्हणजे, गुन्हा दाखल करण्यापूर्वी पीडित तरुणी, तिचे आईवडील, काही सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस अशा सर्वांनीच आरोपी बंटीला समजावून लग्न करण्याची गळ घातली. मात्र, त्याची मुजोरी कायम होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कोठडीत टाकताच त्याची रडारड सुरू झाली. मी तिच्याशी लग्न करणारच होतो, असे म्हणत त्याने नंतर कारवाई रद्द करण्यासाठी विनवण्या सुरू केल्या.