नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांची नवी दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी भारतीय धर्म, तत्त्वज्ञान व संस्कृती शाखेचे अधिष्ठाता प्रा. मधुसूदन पेन्ना यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी प्रा. वरखेडी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.
निरोप समारंभादरम्यान कुलसचिव डाॅ. रामचंद्र जोशी, प्रा. नंदा पुरी, प्रा. कृष्णकुमार पांडे, प्रा. हरेकृष्ण अगस्ती, प्रा. ललिता चंद्रात्रो, प्रा. कविता होले, प्रा. प्रसाद गोखले, डाॅ. दीपक कापडे, डाॅ. उमेश शिवहरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रा. वरखेडी यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांवर प्रकाश टाकण्यात आला.
नुसत्या पदाला अर्थ नाही, हे मी अनुभवाने सांगू शकतो. पदावर राहून कार्य करण्यानेच त्या पदाला अर्थ प्राप्त होतो. पद म्हणजेच काम, कार्य होय. कार्याशिवाय कर्तृत्वाशिवाय पद हे अर्थहीन आहे, अशी भावना प्रा. वरखेडी यांनी व्यक्त केली.