योगेश पांडे / कमल शर्मा
नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याबाबत अखेर एमआयडीसीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून व्यवहार्याता अहवाल तयार करण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे ‘ रिफायनरी ’ व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या या स्पर्धेत मध्यप्रदेश देखील उडी घेतली आहे. मध्यप्रदेश सरकारने मलेशियाच्या एका कंपनीसोबतच करार केला असून संबंधित कंपनी तेथे १० एमएमटीपीए क्षमतेचा प्रकल्प आणणार आहे. यासाठी नागपूरपासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या छिंदवाड्यातील सौंसर येथील जागा पाहण्यात आली आहे. जर असे झाले तर काही तासांच्या अंतरावर असलेल्या विदर्भात ‘ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स ’ तर येऊ शकेल मात्र ‘ रिफायनरी ’ उभारण्याची बाब केंद्र सरकार किती गंभीरतेने घेईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तत्कालीन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २०२१ मध्ये विदर्भात रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. पण त्यावेळी कुणीच पुढाकार घेतला नाही. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित ६० एमएमटीपीए क्षमतेची रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रत्येकी २० एमएमटीपीएच्या तीन युनिटमध्ये विभागली जाईल आणि एक युनिट विदर्भात स्थापन करण्यात येईल, असे पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केले होते. विदर्भाबाबत व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारने एमआयडीसीवर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशने घेतलेल्या पुढाकारामुळे विदर्भाच्या ‘ रिफायनरी ’च्या संधींवर टांगती तलवार राहू शकते. विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पावले उचलण्यात तर येतील. मात्र मध्यप्रदेशमध्ये आणखी एक रिफायनरी आली तर निश्चितच विदर्भात भविष्यात ‘ रिफायनरी ’ च्या संधी धूसर होऊ शकतात. सौंसर येथे सेझसाठी संपादित केलेल्या जागेचा फारसा उपयोग नाही. तेथे जमिनीसह इतर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रिफायनरी सुमारे अडीचशे किलोमीटरच्या त्रिज्येत येणाऱ्या भागाची आवश्यकता पूर्ण करण्यास सक्षम असते. अशा स्थितीत मध्यप्रदेशची रिफायनरी सौंसर किंवा छिंदवाडा येथे आली तर विदर्भात असा कोणताही प्रकल्प येण्याची शक्यता कमी होईल.
मध्यप्रदेशात नेमके काय झाले ?
मध्यप्रदेशातील इंदूर येथे होणाऱ्या प्रवासी भारतीय संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी राज्यात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. कुवेतची एक कंपनी तेथे २६ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गल्फ ल्युब्स ही कंपनी आणि कुवेत स्थित एनबीटीसी कंपनीच्या मलेशिया स्थित सेंट्रल इंडिया फर्टिलायझर्स ॲण्ड रिफायनरी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. व्ही. सत्यनारायण यांच्याशी याबाबत चर्चा केली. कंपनीकडून कुवेत येथील फर्टिलायझर प्रकल्पाचे स्थानांतरण मध्यप्रदेशात करण्यात येणार आहे. तसेच १० एमएमटीपीए क्षमतेची क्रूड ऑइल रिफायनरी मध्यप्रदेशात लावण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मौखिक होकार दिला आहे. खत प्रकल्पात सहा हजार कोटी व रिफायनरीत १५ ते २० हजार कोटींची गुंतवणूक करण्याची कंपनीची तयारी आहे.
बीना येथे अगोदरपासूनच रिफायनरी
मध्यप्रदेशच्या बीना येेथे अगोदरपासूनच रिफायनरी आहे. त्याची क्षमता ७.८ एमएमटीपीए वरून ११.५ एमएमटीपीएवर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात आणखी एक रिफायनरी आली तर महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यप्रदेशची क्षमता जास्त वाढेल व त्याचा फटका गुंतवणुकीला बसण्याची शक्यता आहे.
नागपुरातदेखील केली होती पाहणी
संबंधित मलेशियन कंपनीने काही महिने अगोदर नागपुरात येऊन वेदच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती व पाहणी देखील केली होती. मात्र, मागील तीन महिन्यांच्या कालावधीत ओडिसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक या राज्यांत गुंतवणुकीसंदर्भात परिषदा झाल्यात. तेथे अनेक गुंतवणूकदार गेले. रिफायनरी संदर्भात तेथे जास्त सुविधांचे आश्वासन मिळाल्याने संबंधित कंपनी मध्यप्रदेशमध्ये जाण्यास उत्सुक आहे, अशी माहिती ‘वेद’ चे उपाध्यक्ष व पेट्रोलियम बाबींचे तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी दिली.