लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसी नादुरुस्त झाल्यामुळे शुक्रवारी मदुराई-बिकानेर अनुव्रत एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला. एसी दुरुस्त होईपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका घेऊन तब्बल दोन वेळा चेनपुलिंग केले. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांची समजूत घातल्यानंतर ही गाडी तब्बल तासभरानंतर पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.रेल्वेगाडी २२६३१ मदुराई-बिकानेर अनुव्रत एक्स्प्रेस शुक्रवारी दुपारी २.३९ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. या गाडीतील बी ९ कोचचा एसी नादुरुस्त झाल्यामुळे प्रवाशांना त्रास होत होता. मार्गात सिरपूर कागजनगर, बल्लारशाह, चंद्रपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी एसी दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना पुढील रेल्वेस्थानकावर एसी दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. एसी बंद असल्यामुळे प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटत होते. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी गाडी पुढील प्रवासाला निघाल्यानंतर चेनपुलिंग करून एसी दुरुस्त करण्याची मागणी केली. एसी दुरुस्त केल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका करून तब्बल दोनवेळा चेनपुलिंग केली. प्रवासी चेनपुलिंग करीत असल्याचे समजताच स्टेशन संचालक दिनेश नागदेवे, उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे, आरपीएफचे निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक एस. पी. सिंह यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवासी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर बी ९ कोचमधील प्रवाशांची एसी २, एसी थ्री कोचमध्ये व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर दुपारी ३.३३ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
मदुराई-बिकानेर एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ : एसी नादुरुस्त झाल्यामुळे संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 9:10 PM
एसी नादुरुस्त झाल्यामुळे शुक्रवारी मदुराई-बिकानेर अनुव्रत एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला.
ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावरील घटनादुसऱ्या कोचमध्ये केली प्रवाशांची व्यवस्था, गाडीला तासभर विलंब