लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. यात कारचालकासह अन्य एकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून कार व दारू असा एकूण १ लाख १७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सालई-चिकना मार्गावर नुकतीच करण्यात आली.
रज्जाक सरदार अली व मोहम्मद असगर मोहम्मद अकबर, रा. शांतिनगर, नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. कुही तालुक्यातून माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्याने, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या तालुक्यातील काही भागाची पाहणी करायला सुरुवात केली. त्यातच त्यांना साेमवारी (दि. २२) रात्री ९ वाजताच्या सुमारास सालई-चिकना मार्गावरून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
दरम्यान, त्यांनी एमएच-३१/झेड-९२९३ क्रमांकाच्या कारची झडती घेतली. त्या कारमध्ये ठेवलेल्या रबरी ट्यूबमध्ये माेहफुलाची दारू असल्याचे तसेच ती दारू नागपूर शहरात विक्रीसाठी नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, कारचालक रज्जाक सरदार अली यास अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयाची कार आणि १७,७०० रुपयाची १,२३२ लिटर दारू असा एकूण १ लाख १७ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही दारू मोहम्मद असगर मोहम्मद अकबर याच्या सांगण्यावरून नेली जात असल्याचे रज्जाकने सांगताच, मोहम्मद असगर मोहम्मद अकबर यालाही अटक केली.
या दाेन्ही आराेपींना कुही येथील न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली हाेती. याप्रकरणी कुही पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुभाष खरे, दत्तात्रय वरठी, प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक विनोद भोयर, राजू ठोंबरे, अमोल जाधव, धवल तिजारे, राहुल सपकाळ, शिरीष देशमुख, समीर सईद, सुधीर मानकर यांच्या पथकाने केली.