लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील मुख्य मार्गावर माेकाट गुरांचा मुक्तसंचार व ठिय्याचे प्रमाण वाढले आहे. मालक त्यांच्या गुरांची काळजी घेत नसून, नगरपालिका प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ही जनावरे रहदारीस अडसर ठरत असल्याने किरकाेळ अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. ही समस्या गंभीर रूप धारण करण्यापूर्वी साेडविण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
नागपूर-ओबेदुल्लागंज (भाेपाळ), मध्य प्रदेश हा राष्ट्रीय महामार्ग सावनेर शहरातून गेला आहे. हाच मार्ग शहरातील मुख्य व वर्दळीचा मार्ग असून, या मार्गावरील बसस्थानक चाैक-महात्मा गांधी चौक-राम गणेश गडकरी चौक-छिंदवाडा रोड दरम्यान माेकाट गुरांचा सर्वाधिक वावर आहे. ही जनावरे काही केल्या राेडच्या बाजूला हाेत नाही. यातील काही गुरे मारायला धावतात. त्यामुळे महिला व तरुणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा मार्ग वर्दळीचा असल्याने त्यावर वाहनांची सतत ये-जा सुरू असते. वाहनांच्या हाॅर्नमुळे ते बाजूला हाेत नसल्याने तसेच प्रसंगी ते वाहनांवर येत असल्याने अपघातही हाेत आहेत. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या गुरांच्या मालकांचा शाेध घेत त्यांना नाेटीस बजावाव्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. एवढे करूनही त्यांनी गुरांचा बंदाेबस्त न केल्यास ती गुरे पकडून काेंडवाड्यात टाकावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.