नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचा अकरावा दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारी रोजी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिव्हिल लाईन्स, येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे, या समारंभात गेल्या तीन शैक्षणिक वर्षातील पदव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल रमेश बैस हे ऑनलाईन उपस्थित राहतील. तर प्र-कुलपती आणि महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विशेष अतिथी राहतील. तसेच उत्तर प्रदेशातील पंडित दीन दयाल उपाध्याय पशु चिकित्सा विज्ञान विद्यापीठ व गो-अनुसंधान संस्थानचे कुलगुरू डॉ. ए.के. श्रीवास्तव हे दीक्षांत समारंभाचे बिजभाषण करतील.
२०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन शैक्षणिक वर्षातील पदव्यांचे वितरण यावेळी करण्यात येतील. एकूण ८५९४ पदव्यांचे वितरण करण्यात येतील. पत्रपरिषदेला एस.वी. उपाध्ये, सुधीर दिवे, डॉ. पी.एम. वासनिक उपस्थित होते.
- प्रज्वल चापलेला ४ सुवर्ण व ३ रौप्य पदक
नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रज्वल चापले याने २०२१-२२ या सालासाठी ४ सुवर्ण व ३ रौप्य पदक पटकावले. यासोबतच मुंबईच्या खेमानी कनिश्का कौशीक हिने पाच सुवर्ण पदकासह २५ हजाराचा रोख पुरस्कार तसेच मुंबईच्याच महिमा गुलाटीने तीन सुर्वपदकासह २५ हजाराचा रोख पुरस्कार पटाकवाल. तीन वर्षातील तीन २५ हजाराचे रोख पुरस्कार मुलींनीच पटकावले.