लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जाहिरातीच्या युगात कुठलीही गोष्ट नेत्रसुखद असेल तर तिच्याकडे पटकन लक्ष वेधले जाते. त्यातील स्लोगन आणि नक्षीदार अक्षरे कुणालाही आकर्षित करणारे असतात. केवळ संवाद साधने अक्षरांचे काम राहत नाही, तर लक्ष वेधणारे, मोहात पाडणारे चुंबकत्व निर्माण करण्याचे काम अशा शैलीदार अक्षरांमुळे होते. म्हणूनच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी अक्षरांच्या वेगवेगळ्या शैलीची नितांत गरज असते. मराठी भाषेत ४०० प्रकारच्या शैलीची अक्षरे निर्माण करणारे चित्रकार जयंत गायकवाड यांनी अक्षरांचे हे चुंबकत्व प्रेक्षकांसमोर उलगडले.यशवंतराव चव्हाण सोशल फोरमतर्फे आयोजित अनादी या कलासृजन चित्रप्रदर्शनात शनिवारी जयंत गायकवाड यांनी अक्षरांच्या निर्मितीचे कलाभाष्य केले. मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात लागलेल्या चित्रप्रदर्शनात सहभागी असलेले चित्रकार अरुण मोरघडे, नाना मिसाळ व दीनानाथ पडोळे यांच्यासह प्रसिद्ध नकलाकार राजाभाऊ चिटणीस, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, ललित कला विभागाच्या प्रमुख मुक्तीदेवी मोहिते, संयोजक दिलीप पनकुले, सहसंयोजक संजय पुंड यांच्यासह कलावंत आणि कला संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चित्रप्रदर्शनातील हे आयोजन खरोखर अनोखे ठरणारे होते. जयंत गायकवाड यांनी अतिशय मार्मिक शब्दात शैलीदार अक्षरांच्या निर्मितीची कथा मांडली. इंग्रजी भाषेत अक्षरांच्या शैलीची विपुलता आहे, मात्र मराठीत खूप कमी फॉन्ट असल्याची खंत होती. पुस्तकांच्या मुखपृष्ठ डिझाईनसाठी विविध शैलीच्या अक्षरांची गरज पडायची व यातून अशाप्रकारच्या शैली निर्माण झाल्या. माणूस म्हटला की राग, लोभ, मोह, माया लागून आहेत. अशा प्रत्येक भावनेनुसार अक्षरे वळली तर? क्रोध, आनंद व्यक्त करणारी, कधी नाजूक क्षण उलगडणारी, सावली पडलेली, धावणारी, अलंकारिक, एकमेकात गुंतलेली तर कधी साधी आणि सरळ अक्षरे पाहताना प्रत्येक जण त्याकडे ओढला जातो. अशा शैलीदार अक्षरांची कहाणी गायकवाड यांनी मांडली. चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, हे आयोजनही सर्वांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. विशेषत: चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे होते.बिजय बिस्वाल यांनी उधळले जलरंग