लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकमतने आयोजित केलेली महामॅरेथॉन ही नागपूरसह विभागातील धावपटूंसाठी पर्वणी आहे. अशा आयोजनांमुळे धावपटूंना बळ मिळतेच शिवाय धावण्याची चळवळ देखील रुजविण्यास मदत मिळते, असे मत माजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू विद्या देवघरे (धापोडकर) यांनी व्यक्त केले.वेगवेगळ्या वयोगटातील, घटकांतील लोक एकत्र येणे हा चांगला संदेश आहे. महामॅरेथॉन हा चैतन्याचा सोहळा असून लोकमतचा पुढाकार हा स्वच्छ आणि स्पष्ट असल्याने अनेक लोक लोकमतशी जोडले गेले आहेत. त्यापैकीच मी एक असल्याचे विद्या यांनी सांगितले. द.पूर्व रेल्वेत कार्यरत असलेल्या विद्या मैदानावर आजही सक्रिय आहेत. त्यांनी ४५ वर्षे वयोगटात वाशिम येथे ४००, ८०० आणि १५०० मीटर दौडमध्ये नुकतेच सुवर्ण जिंकले. मास्टर्स गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत असलेल्या लांब पल्ल्याच्या शर्यती गाजविणाऱ्या विद्या म्हणाल्या,‘आयोजन निटनेटके असून खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करण्यास पूरक आहे. अलीकडे मॅरेथॉनचे आयोजन सर्व स्तरावर वाढल्याने खेळाडू देखील उत्साहित असतात. दौड पूर्ण केलीच पाहिजे असे नाही, सहभाग नोंदविणे आणि मॅरेथॉनचा आनंद उपभोगणे ही देखील महत्त्वाची बाब आहे. यामुळे धावण्याचे महत्त्व आणि जागरुकता वृद्धिंगत होते.’ लोकमतच्या पुढाकाराने आयोजित होत असलेल्या महामॅरेथॉनबद्दल त्या म्हणाल्या,‘प्रत्येक उपक्रमात लोकमत नंबर वन असतो, मॅहामॅरेथॉनचे आयोजनदेखील अल्पावधीत लोकप्रिय होईल. नव्या दमाच्या धावपटूंसाठी लोकमतने उपलब्ध करून दिलेली संधी त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजविण्यास उपयुक्त ठरेल’, अशी खात्री आहे. युवा धावपटूंना मैदानावर घाम गाळून अधिक कठोर मेहनत करण्याचा सल्ला देत विद्या पुढे म्हणाल्या,‘आमच्यावेळी नागपुरात सिंथेटिक ट्रॅकची सोय नव्हती. पुरेशी मैदाने नव्हती. सुसज्ज व्यवस्था नव्हती. तरीही आम्ही मैदान गाजवित नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. सध्या अनेक सोयी उपलब्ध झाल्याने युवा धावपटू नागपूरला ‘लांब पल्ल्याच्या धावपटूंचे शहर’ अशी ओळख पुन्हा मिळवून देतील यात शंका नाही,’
विद्या देवघरे यांची मॅरेथॉन कामगिरीविद्या यांचा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये धावण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या पॅरिस येथील वर्ल्ड क्रॉस कंट्री, बोस्टन (अमेरिका) तसेच बुडापेस्ट (हंगेरी) येथील विश्व क्रॉस कंट्रीत सहभागी होत्या. १९९३ ची ठाणे महापौर मॅरेथॉनच्या त्या विजेत्या आहेत. त्याआधी १९९० मध्ये त्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन देखील जिंकली. याच स्पर्धेत त्यांनी चारवेळा पहिल्या तीन धावपटूंमध्ये स्थान मिळविले होते. आंतर रेल्वे आणि विभागीय स्पर्धांमध्येही विद्या यांनी स्वत:चे स्थान मिळविले होते. १९९०ते २००० च्या दशकात विद्या देवघरे यांच्या नावाने अन्य धावपटूंना घाम फुटायचा. विद्या मैदानावर असेल तर आपले काय, याबद्दल धडकी भरायची.अलाहाबादच्या अ.भा.इंदिरा मॅरेथॉनमध्ये ४२ किमी अंतराच्या शर्यतीच्या त्या विजेत्या राहिल्या आहेत. आजही युवा धावपटूंना मार्गदर्शक आणि प्रेरक ठरावा असा मैदानावरील सराव कायम आहे. मास्टर्स गटाच्या विविध अंतराच्या स्पर्धेत विद्या पदक विजेत्या ठरत आहेत.