महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा १६ रोजी नागपुरात
By कमलेश वानखेडे | Published: April 4, 2023 03:08 PM2023-04-04T15:08:25+5:302023-04-04T15:16:34+5:30
उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही राहणार
नागपूर : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा १६ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीचे राज्यातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. ही निवडणुकीची सभा नाही तर शिंदे- फडणवीस सरकारच्या खोट्या आश्वासनाने मोडलेल्या सर्वसामान्य माणसाला धीर देणारी सभा आहे, असे या सभेच्या आयोजनाची जबाबजारी असलेले माजी मंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
केदार म्हणाले, या सभेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित राहतील. या सेभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्रित पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र बैठका घेतील. महाविकास आघाडीच्या नाशिक, खेड, संभाजीनगर येथील सभांना सामान्य माणसांचे भरभरून समर्थन मिळाले आहे.
१६ एप्रिलपर्यंत नाना पटोले गुवाहाटीत असतील.., काँगेस नेत्याचा गंभीर आरोप
नागपुरातील सभाही ऐतिहासिक होईल, असा दावाही केदार यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे व उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांनी सभेसाठी आपला पक्ष पूर्ण ताकद लावेल, असे आश्वस्त केले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, रमेश बंग, माजी आ. अशोक धवड, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रमोद मानमोडे, प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, चंद्रपाल चौकसे, हुकुमचंद आमधरे, नरेंद्र जिचकार, सलील देशमुख आदी उपस्थित होते.
म्हणून उद्धव ठाकरेंची खुर्ची उंच...
- संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंची खुर्ची उंच का होती, यावर केदार म्हणाले, उद्धव ठाकरे हे एका कठीण सर्जरीतून बाहेर आले आहेत. त्यामुळे त्यांनी किती उंचीच्या खुर्चीवर बसावे, कसे बसावे, किती वेळ बसावे, बसल्यावर पाय टेकवण्यासाठी जागा किती असावी या सर्व बाबी त्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच केल्या जातात, असेही केदार यांनी स्पष्ट केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी प्रफुटफूल सभेची व्याख्या स्पष्ट करावी, नंतर त्यावर उत्तर देऊ, असा टोलाही त्यांनी लगावला.