नागपूर : भाजपने कितीही घोडेबाजार केला, केंद्रीय तपास यंत्रणांचा कितीही दुरुपयोग केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष उभा ठाकला आहे. भाजपने अतिरिक्त उमेदवार दिल्याने या निवडणुकीतील चुरस वाढल्याचे बोलले जात आहे. तर, भाजप घोडेबाजार करणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातही अशाप्रकारचे काही भाजपा नेते आहेत, जे रोज..
भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील एका चर्चेत एका धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. यावरुन पटोले यांनी भाजपवर ट्विटरवरून टीका केली आहे. त्यांनी एकामागून एक ट्विट करत प्रतिक्रिया नोंदवली आहे. ''भाजपाच्या प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची भाजपाने पक्षातून हक्कालपट्टी केली. समाजात ते दोघेही धार्मिक द्वेष पसरवत होते. महाराष्ट्रातही अशाप्रकारचे काही भाजपा नेते आहेत, जे रोज धार्मिक द्वेष पसरवत आहेत.''
त्यांनी आणखी एक ट्विट केलं असून यात ते म्हणाले, ''सर्व प्रथम देश नंतर स्वतः’ हे भाजपाला कधी समजणार देव जाणो. अमेरिका, अनेक युरोपियन देश व आखाती देशांनी भारतावर व्यापार बंदी आणली, तेव्हा मोदी सरकारची अक्कल ठिकाणावर आली. नाहीतर निवडणूक जिकंण्यासाठी हे सख्ख्या भावांमध्ये देखील भांडण लावतील.''
काय आहे प्रकरण
भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील एका चर्चेत एका धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हिंसक घटना घडल्या. तसेच वादग्रस्त ट्वीटमुळे भाजप नेते नवीनकुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या शिस्तपालन समितीने म्हटले की, शर्मा यांनी एका धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करून भाजपच्या ध्येयधोरणांचा भंग केला. त्यासंदर्भात पक्षांतर्गत चौकशी होणार आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, कोणताही धर्म, त्यातील व्यक्तींबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह उद्गारांचा भाजप निषेध करतो. भाजप सर्व धर्मांचा आदर करतो.