नागपूर : शिक्षक मतदारसंघात आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार २८ हजार मतांची मोजणी झालेली आहे. यात महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले आघाडीवर असून विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. अडबाले हे ९ हजार मतांनी पुढे आहेत.
शिक्षक मतदारसंघात ८६.२३ टक्के बंपर मतदान झाले. ३९ हजार ४०६ मतदारांपैकी ३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागपूर जिल्ह्यात १३,४२० मतदान झाले. यापैकी नागपूर शहरात ८ हजार तर ग्रामीणमध्ये ५ हजार मतदान झाले. निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता अजनीच्या समुदाय भवन येथे सुरुवात झाली असून २१ टेबलवर मोजणी सुरू आहे.
दरम्यान, नागपूर पदवीधर निवडणुकीतही भाजपला आपणच जिंकणार, अशी पूर्ण खात्री होती. कारण गेली १२ वर्षे येथे भाजपचे आमदार म्हणून नागो गाणार होते व आताही हा मतदारसंघ भाजपचाच गड आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता भाजपच्या गडात त्यांचाच धुव्वा उडतो की काय, हे चित्र थोड्या वेळात स्पष्ट होईल.